पुणे / रमजान मुलाणी : मुंबई महामार्गालगत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी भागात एकाच दिवशी तब्बल 07 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, तर तिघांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या एकाच दिवशी झालेल्या सात मृत्यूनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
फुगेवाडी गावातील आझाद चौकातील एका शोककुलाच्या फलकावर जेव्हा या या सर्वांच्या निधनाची माहिती एकत्रितपणे प्रसिद्ध झाली, तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
धक्कादायक बाब म्हणजे, एकाच दिवशी गावातील सात जणांचा मृत्यू झाला असला तरी यापैकी कुणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असेल याचा तर्कवितर्क सुरू आ अवैध हातभट्टीच्या दारूमुळे मृत्यू झाला असल्याची कुजबुज सुरू होती. या धक्कादायक घटनेनंतर फुगेवाडी परिसरात सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे.
गावातील आझाद चौक आणि परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे या सातही नागरिकांचा मृत्यू हा याच अड्ड्यांवरील विषारी किंवा भेसळयुक्त गावठी दारू पिल्यामुळेच झाला असावा, अशी भीती आणि दबक्या आवाजातील चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
पोलिसांचा प्राथमिक तपासात मोठा खुलासा
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दापोडी पोलिसांनी (Dapodi Police) तातडीने या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला. मात्र, पोलिसांनी तपासानंतर स्थानिक नागरिकांचे सर्व दावे आणि चर्चा निराधार निघाल्या आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासाअंती या 07 ही घटना पूर्णपणे वेगवेगळ्या आणि स्वतंत्र असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
07 जणांपैकी चार मृतांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते आणि कोणत्याही नातेवाईकाने आपल्या माणसाने हातभट्टीची दारू पिल्याची साधी तक्रारही पोलिसात केलेली नाही, असे दापोडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दापोडी पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मृत पावलेल्या सातही नागरिकांची पार्श्वभूमी आणि मृत्यूचे प्राथमिक कारण खालीलप्रमाणे समोर आले आहे:
➡️ पांडुरंग फुगे (वय- 57) : यांचा मृत्यू हा पूर्णपणे नैसर्गिक (Natural Death) कारणाने झाला आहे.
➡️ विजय राठोड (वय- 31) व राजेंद्र राठोड (वय- 34) : या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
➡️ राजेंद्र राजपूत (वय- 51) : हे घरात असताना अचानक बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
➡️ अकबर पठाण (वय- 52) : हे गेल्या 15 वर्षांपासून तीव्र दारूच्या सवयीचे (Alcohol Addiction) होते. त्यांचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने किंवा इतर आजाराने झाल्याची शक्यता आहे.
➡️ आनंद काशिनाथ निकाळजे
➡️ आनंद पांडेराव देसाई
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी पोलीस करत आहेत. एकाच दिवशी झालेल्या या 07 मृत्यूंमागे कोणताही साखळी गुन्हा किंवा विषारी दारूचा संबंध नसल्याचं पोलिसांनी सुरुवातीला म्हटलं असलं, तरीही सर्व मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल (Post Mortem Report) आल्यानंतरच मृत्यूचे नक्की आणि अचूक कारण काय होतं, हे वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट होईल, असंही बोललं जात आहे.
