आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे तर कौशल्यांवरही द्यावा भर : राजेंद्र वारगड

shivrajya patra

 
दहावी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि यशाचा जल्लोष

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे तर कौशल्यांवरही द्यावा भर : राजेंद्र वारगड

सोलापूर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे तर कौशल्यांवरही भर द्यावा, असं आवाहन प्रशासन अधिकारी राजेंद्र वारगड यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना केले.

अक्कलकोट रोडवरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयांमध्ये इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025-26 मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक यशाचा गौरव करत प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. प्रकाश नांगरे (उपशिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर), राजेंद्र वारगड (प्रशासन अधिकारी, पंचायत समिती उत्तर सोलापूर), शुभम संजीव सदाफुले (उपसंचालक-कृषी विभाग) तसेच सद्संकल्प शिक्षण समूहाचे पदाधिकारी बोधीप्रकाश गायकवाड, रत्नदीप कांबळे (संचालक), सौ. मंजुश्री खंडागळे (मुख्याध्यापिका, राष्ट्रसंत प्राथमिक शाळा) आणि सत्यवान पाचकुडवे (मुख्याध्यापक, विश्वभूषण विद्यालय) उपस्थित होते.
पंचायत समिती उत्तर सोलापूरचे प्रशासन अधिकारी वारगड यांनी शासकीय योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असंही त्यांनी याप्रसंगी म्हटले.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने करावी पुढील शैक्षणिक वाटचाल : उपशिक्षणाधिकारी नांगरे

दहावी हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यशासाठी सातत्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढील शैक्षणिक वाटचाल करावी, असं आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

अखेरीस त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत मूल्यसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

मेहनत, चिकाटी आणि वेळेचे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली : शुभम सदाफुले
मेहनत, चिकाटी आणि वेळेचे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे शुभम संजीव सदाफुले यांनी थोडक्यात मार्गदर्शन करताना सांगितले. 

ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांनी संधींचा योग्य वापर करून स्वतःची ओळख निर्माण करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी शाळेची व संस्थेची वाटचाल याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचेही कौतुक केले.

कार्यक्रमात वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी धारेप्पा तळे यांनी उपस्थितांचे आभार
मानले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.

To Top