रमजानुल मुबारक - २
सत्कार्याचा प्रोत्साहक - रमजान
पवित्र रमजान महिन्याला कालपासून प्रारंभ झाला आहे.परवा सायंकाळी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे चंद्रदर्शन झाले नाही.
पवित्र रमजान महिना सायंकाळी मगरीब नंतर जो तो चंद्रदर्शन कुठे झाले का याची आतुरतेने विचार न करीत होते.चंद्रदर्शनाबाबत धार्मिक दृष्ट्या काही संकेत आहेत साधारण दोनशे किलोमीटरच्या आत जर चंद्र दर्शन झाले तर त्या ठिकाणी मास आरंभ होतो. इतर ठिकाणी मात्र त्याची साक्ष पटल्यानंतरच ग्राह्य धरला जातो.
देशाच्या अनेक भागांमध्ये याबाबत भिन्नता दिसते मात्र परवा सायंकाळी संपूर्ण देशभरात एकाच वेळी चंद्र दर्शन झाल्याच्या वार्ता आल्याने एकाच वेळी रमजान महिना सुरू झाला.
जुन्या काळात चंद्रदर्शनाबाबत काही संभ्रम होते. त्यामुळे प्रेषित हजरत पैगंबर आणि चंद्र पाहून रोजी सुरू करा आणि चंद्र पाहून ईद साजरी करा, असे संकेत दिले. ती परंपरा आजही सुरू आहे.
ज्या ठिकाणी चंद्र दर्शन होणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तो पहावा आणि मग रोजे सुरू करावे. याबाबत उलेमांची समिती जिल्हा सिरत कमिटी म्हणतात ती निर्णय घेत असते.
रमजान हा प्रत्येक सत्कार्याची प्रेरणा देणारा महिना आहे .चांगल्याचे संवर्धन आणि वाईटाचे क्षालन हा या महिन्याचा स्थायीभाव आहे. मोठ्यापासून छोट्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाईट कृत्यापासून अलिप्त राहून, करता येईल तेवढे चांगले आणि सत्कार्य करण्याची प्रेरणा रमजान महिन्यात मिळते.
अल्लाहची प्रार्थना (इबादत) ही फक्त नमाज, रोजा आणि कुरआन पठण केल्याने होत नाही तर आपण जे कर्म करतो, जे कार्य करतो ती सुद्धा इबादत आहे. भुकेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे, आजारी रुग्णांची सेवा करणे, गरजवंताला मदत करणे, ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना आहे.
रमजानुल मुबारक - ३
पुण्यकार्याची अनुभूती देणारा महिना-रमजान
इस्लामी वर्षाचा नववा महिना म्हणजे रमजान... ! अनादी काळापासून या महिन्याचे महत्त्व अगाध आहे. अल्लाह चा महिना म्हणून देखील याला संबोधले जाते.जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्याचे भक्तीभावाने पालन करतात. काल एक मित्र मला म्हणाला कि, या वर्षी रमजान महिना लवकर आला आहे का ? पण तसे नाही.
पहाटे उठून सहेरी खाणे,नंतर फजर ची नमाज,कुरआन शरीफ ची तीलावत,अल्लाह चे नामस्मरण,दुपारी जोहरची नमाज,सायंकाळी असरची नमाज,सूर्यास्ताच्या वेळी रोजा सोडणे व मगरीब नमाज अदा करणे,जेवण करणे,रात्री ईशा व तरावीहची नमाज अदा करणे याबरोबरच सर्व प्रकारचे पुण्यकार्य या महिन्यात केले जाते आणि म्हणून पुण्यकार्याची अनुभूती देणारा महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
(क्रमशः)
