1997 च्या बॅचचं गेट-टुगेदर ... ' मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ' अशा विश्वासानं वर्गमित्र परतीच्या प्रवासाला !

shivrajya patra

सचिन क्षिरसागर/रमजान मुलाणी 

कासेगांव : ' फिरून या पाखरांनो ' अशी साद देत जवळपास दोन तपानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांचं एकत्र येणं एक जल्लोष अन् अविस्मरणीय आनंदोत्सवाचा क्षण ... !  बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला, कासेगांव येथील इयत्ता दहावी 1997 ची बॅच... स्थळ होतं उळेवाडी येथील शेती अन् मातीत निसर्ग सानिध्यात छोटी-छोटी झाडं,पाना-फुलांची हिरवी शाल पांघरलेलं छोटेखानी सिजलर पार्क ... इथंच जे प्रपंचाच्या रहाटगाडग्यात विखुरलेले मात्र परस्परांतील मित्र भावनेच्या भेटीच्या ओढीनं पुन्हा वर्षांनंतर भेटीच्या ओढीनं 'सलामत रहे दोस्ताना हमारा' म्हणत एकत्र आलेले वर्गमित्र... स्नेहमेळावा समारोपाच्या सांजवेळी आलेले सर्व वर्गमित्र ' मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ' अशा विश्वासानं परतीच्या प्रवासाला लागले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवच्या पंचक्रोशीतील कासेगांव, उळेगांव, उळेवाडी, आधीच्या उस्मानाबाद आणि आताच्या धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील खडकी, धोत्री या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत होते. 

या प्रशालेची इयत्ता दहावीची 1997 ची बॅच... या बॅचचे विद्यार्थी... प्रारंभी शिक्षणासाठी अन् त्यानंतर रोजगाराच्या संधी शोधात विखुरले. कधी भ्रमणध्वनीवर खुशालीची विचारपूस वा वाटेत भेट झाली तर नमस्काराची मैत्री... परगांवचे वर्गमित्र त्यांच्या गांवी, स्थानिक मित्रही रोजगार वा कामाच्या संधीमुळं सोलापूर, पुणे, लातूर वा इतरत्र विखुरलेले होते.

2022 साल उजाडलं, ते बॅ. भोसले प्रशालेच्या इयत्ता दहावी 1997 च्या बॅचचं गेट-टुगेदर घेऊनच ... जवळपास 25 वर्षांनंतर ही बॅच त्यावर्षी पहिल्यांदा एकत्र आली. या कालचक्रात स्वच्छंद बालपण संपून प्रत्येकाच्या डोईवर प्रपंच वा जबाबदाऱ्यांचा भार वाढलेला होता. तो एक दिवसापुरता दूर लोटत, त्यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी पहिला गेट-टुगेदर पार पडला.  

गेली पाच वर्षे ही बॅच 22 फेब्रुवारी रोजी आपल्या संसारातील कामे, कामांचा व्याप बाजूला ठेऊन जिथं आहेत, पुणे, लातूर, वा सोलापूरसह अन्य शहरांकडून 'गेट-टुगेदर' च्या निमित्तानं एकत्र येतात, वर्षातून एक दिवस सर्व मित्रांची भेट व्हावी, एकमेकांच्या अडचणी,  सुख-दुःखाचं अदान-प्रदान एकमेकांचं मन मोकळे करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात.

रविवारी, 22 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच  1997 ची बॅच सिझलर्स पार्कमध्ये एकत्र आली. एकमेकांशी हितगुज सुरू झाली. हे सर्व मित्र बळीराजाचा वारसा जपणारी शेती आणि मातीशी अतूट नातं असणारी पिढी, पण सिजलर्स पार्कच्या या स्नेहमेळाव्यात हुरडा-पार्टीचंही आयोजन होतं.

स्नेहमेळाव्याचा प्रारंभ, या बॅचचे शिक्षक बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बोधिप्रकाश गायकवाड सर यांचा सपत्नीक सत्काराने झाला. या सत्कारानंतर दिवंगत मित्र तसेच मित्राच्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या माता-पित्यानाही आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात धोत्री गावचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांच्या प्रास्ताविकानं झाली. यावेळी विनोद कुंभार, गणेश गरड, महादेव सोनटक्के, योगीराज भोज, जोतिबा जाधव, सुभाष येणगुरे यांच्यासह अन्य मित्रांनी  आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या बहारदार सूत्रसंचालनाची धुरा सालाबादप्रमाणे यंदाही सचिन क्षिरसागर यांच्याकडेच होती. अखेरीस प्रा. बोधिप्रकाश गायकवाड सरांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी रघुनाथ काटकर, नवनाथ हेडे, सोमनाथ मुटकुळे, ताजुद्दीन अत्तार, दाजी जगताप, परमेश्वर डांगे, संतोष धनवडे, अनिल जाधव, श्रीकांत रेड्डी, दीपक मोरे, श्याम हुडकर, जोतिबा माने, शिवकुमार कदम, दत्ता पाटील, दयानंद जाधव, अमोल पाटील, रमजान मुलाणी, रहिम नदाफ, सचिन काळे, अमोल जाधव, सत्यवान गाढवे, सैपन शेख, श्रीधर भुसारे, पांडुरंग कुंभार, शिवाजी मोटे, एकनाथ गोवर्धन, शंकर वाडकर, मधुकर खंडागळे आणि लक्ष्मण मस्के आदी वर्गमित्र परिवार उपस्थित होता.

मित्रांनो, आयुष्य हे रहाटगाडग्यासम आहे, प्रत्येकाला संसारात 'कमी-अधिक' असणार आहे. यातूनही वेळ काढण्याच्या पायाभरणीसाठी आपण स्वतःला वेळ द्यावा, या भावनेने 'गेट-टुगेदर' चा प्रारंभ झाला खरा, आज त्यास पाच वर्षे पूर्ण झालीत. प्रारंभीच्या दोन कार्यक्रमासाठी राजू शेख हा वर्गमित्र होता, त्यानंतर राजूच्या निधनानं हा मैत्रीचा धागा तुटला. अशी वेळ कोणावरही येऊ नये, त्याच्या अकाली Exit वर आज तीन वर्षांनंतरही वर्ग मित्र परिवारात संवेदना व्यक्त होतात, हीच मैत्री ! आपले चाललेले जीवन समृध्दीचं नसलं तरी चालेल, सुखाचं असावं, अशी भावना काही मित्रांनी ईश्वरचरणी व्यक्त केली.

दुपारनंतर सर्वांनी एकत्र येऊन नृत्याचा आनंद घेतला. स्नेहभोजनानंतर सायंकाळी कार्यक्रमाची सांगता झाल्यावर स्नेहमेळावा समारोपाच्या सांजवेळी कवि अनंत राऊत यांच्या ' दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ' अशा विश्वासानं सर्वच वर्गमित्र पुन्हा परतीच्या वाटेवर राहिले.

To Top