रमजान महिन्यातील रोजा नंतरचे महत्वाचे कार्य म्हणजे कुरआन शरीफ पठन होय. कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे. तो रमजान महिन्यातच अल्लाहतआला ने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांचे पर्यंत आपल्या खास फरिश्त्या मार्फत पोहोचविला.
हजरत पैगंबरांनी फरिश्ता हजरत जिब्रईल अलैसलाम यांचेकडून शिकून घेऊन तो आपल्या अनुयायी लोकांपर्यत पोहोच केला. रमजान मध्येच कुरआन शरीफचे अवतरण पृथ्वीवर झाले. त्यामुळे रमजान महिन्यात जगातील प्रत्येक मशिदीत दररोज रात्रीच्या नमाजे तरावीह मध्ये कुरआन पठन केले जाते.
घराघरातही माता-भगिनी तसेच बंधू लोक त्याचे वाचन करतात. सुमारे २३ वर्षाचा काळ पूर्ण कुरआन शरीफ अवतीर्ण होण्यास लागला. जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती व मार्गदर्शन अल्लाहने कुरआन मध्ये केलेले आहे.
आज जगातील जवळपास प्रत्येक भाषेत कुरआन शरीफ चे भाषांतर उपलब्ध आहे. मराठी मध्ये देखील ते उपलब्ध असून दैनिक 'लोक आवाज' च्या वाचकांना देखील ज्यांनी मराठी कुरआन शरीफ वाचण्याची इच्छा दाखवल्यास ते दिले जाते.
गेली पाच वर्ष हा उपक्रम सुरु असून वाचकांचा उत्तम प्रतिसाद यासाठी मिळत असतो. गेली २८ वर्ष या लेखमालेचे लेखन करतांना वाचकांचे फोन दररोजच येतात.
इस्लाम धर्माबद्दलचे इतर धर्मिय बांधवात असलेले अनेक गैरसमज या लेखमालेमुळे दूर होऊन इस्लाम धर्म, कुरआन, इस्लामी जीवन प्रणाली, अल्लाह व पैगंबरांचे आदेश, प्रेषित यांचे बाबतची वस्तुनिष्ठ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवून धार्मिक समज, गैरसमज व शंकानिरसन करण्यात या लेखमालेने मोठी भूमिका बजावली आहे.
अनेक बंधू भगिनी दररोज फोन करुन इस्लामशी संबंधित माहितीची देवाण-घेवाण करतात. शंकानिरसन करतात. कुरआन शरीफ मध्ये जीवनासाठी आवश्यक अशा सर्व बाबींचे मार्गदर्शन केलेले आहे.
जगातील अनेक विद्यापीठातून कुरआन शरीफ मध्ये सांगितलेल्या गोष्टींबाबत संशोधन केंद्रे स्थापित करण्यात आलेली असून त्यावर अव्याहत संशोधन सुरु आहे.
