रमजान महिन्यातील केले जाणारे प्रत्येक कार्य पुण्यप्राप्ती करुन देणारे, एकमेकांना सहाय्य करणारे, गोर गरीब, दीन, अनाथ, विधवा गरजूंना मदत करणारे असते. समाजातील विविध घटकांच्या समस्यांची जाणिव रमजानच्या रोजातून होते.
आपल्या आसपास जे लोक राहतात त्यापैकी काही गरीब आहेत, गरजू आहेत, कोणी आजारी आहेत, कुणाच्या घरात खायला नाही, कुणी अनाथ आहेत, निराधार-बेसहारा आहेत, वृध्द आहेत, अशा लोकांच्या विविध समस्या सोडविणारा कुणी नाही.
अशा घटकांना सामाजिक जाणिव व माणुसकीच्या भावनेतून आपण मदत केली पाहिजे, ही वृत्ती रोजामुळे निर्माण होते. भूकेची जाणिव होऊन भुकेल्या बद्दल सहानुभूती निर्माण होऊन अशा घटकांना मदत केली पाहिजे ही भावना उदयास येते. गरीबांना ही अन्न-पाणी, निवारा आवश्यक आहे, त्यांनाही कपडे दिले पाहिजे, आजारी रुग्णांना मदत केली पाहिजे, अशा प्रकारच्या जाणिवा रोजामुळे कळतात, त्यातूनच मदतीचा हात पुढे येतो.
हजरत पैगंबरांनी समाजातील अशा घटकांना शक्य तेवढी मदत करण्याची शिकवण दिली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावतांना आज माणुसकी व नातं लोप पावत आहे. भाऊ भावाला विचारीत नाही, ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठे केले अशा मातापित्यांना न विचारणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे भरपूर लोक समाजात आहेत. अशा वेळी अशा घटकांना मदतीचा हात देण्याची गरज असते. रोजातून हीच भावना निर्माण होते.
आपण प्रगतीची खूप शिखरं सर केली असली तरी अधोगतीच्या दऱ्यादेखील निर्माण केल्या आहेत. आई घरात मरुन पडली तरी देखील तिच्याकडे न पाहणारे किंवा अमेरिकेत मुलाला पाठविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा बाप जेव्हा मेला तेव्हा त्या बापाच्या अंतिम संस्कारांसाठी वेळ नसणारा मुलगा आपल्या समाजाने अनुभवला आहे.
प्रत्येक धर्मात अशा प्रकारची मदत करणारे हजारो हात परमेश्वराने निर्माण केले आहेत, ते आपल्या परीने मदत करीत असतात. यालाच पुण्यवान म्हणतात.
