15. 50 लाखांची फसवणूक; डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : अपार्टमेंटमधील रहिवासी या नात्याने परिचीत असलेल्या कुटुंबाची डॉक्टर दाम्पत्यानं प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने 15, 50, 000 हजार रुपयांची फसवणूक केलीय. ही घटना 2022 ते आजमितीदरम्यान वेळोवेळी घडलीय. या प्रकरणी उध्दव इंगोलेसह दोघांविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुळे सोलापुरातील डी मार्टजवळील योगेश्वरी सिल्वहर हाईटमधील रहिवाशी रजनीश कुमार शर्मा सहकुटुंब वास्तव्यास असून त्याच अपार्टमेंटमधील उध्दव इंगोले आणि दीपा इंगोले यांनी रजनीश शर्मा आणि त्यांच्या पत्नीशी जवळकीता निर्माण करून रजनीश यांचा विश्वास संपादन केला. 

सन २०२२ मध्ये रजनीश शर्मा यांना, तुम्हाला प्लॉट खरेदी करून देतो असे म्हणून तसेच उध्दव इंगोले यांना नवीन हॉस्पीटल काढायचे आहे, तर आम्हाला पैशाची गरज आहे असे बोलून इंगोले यांनी शर्मा, त्यांची पत्नी आणि शर्मा यांचा मेव्हणा सोमनाथ स्वाईन (रा. जमशेदपुर झारखंड) असे तिघांकडून वेळोवेळी रोख स्वरूपात तसेच ऑनलाईन स्वरूपात 15, 50, 000 रूपये एवढी रक्कम घेतली. 

शर्मा यांनी जेव्हा इंगोले यांच्याकडं प्लॉट आणि दिलेल्या रक्कमेसंबंधी विचारले असता, 'धमकी देऊन तुझे पैसे देत नाही, काही करायचे ते कर' असे म्हणून त्यांना धमकी दिली. तसेच इंगोले यांनी नोटरी करारपत्र लिहून देऊन तसेच पुढील तारखेचे पैसे नसलेल्या बँक खात्याचे चेक देऊन रक्कम न देता शर्मा यांची फसवणूक केली. 

याप्रकरणी रजनीश शर्मा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर उद्धव इंगोले आणि दीपा इंगोले यांच्याविरुद्ध भा. न्या. संहिता कलम ३१६ (२), ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top