धाराशिव : दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करुन माझा मुलगा सन्मित याचा वाढदिवस साजरा करण्याची सुवर्णसंधी या शाळेचे विशेष शिक्षक भगवान चौगुले यांनी दिली. हा दिवस माझ्या स्मरणात कायम राहिल, असं नवनाथ बिराजदार यांनी म्हटले.
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रारंभी येथील श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेत अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता भादुले (पुणे) यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. धाराशिव जनता बँकेचे सिनीयर ऑफीसर नवनाथ बिराजदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
नवनाथ बिराजदार यांनी त्यांचे चिरंजीव सन्मित याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले, तर सामाजिक कार्यकर्ते भादुले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना ऐकता व बोलता येण्यासाठी आवश्यक असणारी स्पीच ट्रेनर मशीन देणगी तात्काळ जाहीर केली व संबंधित कंपनीला संपर्क साधला.
या निमित्तानं दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी मिळाली असल्याचं भादुले यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
याप्रसंगी नंदिनी घोगरे या दिव्यांग विद्यार्थीनीने हाताने तयार केलेले लोकरीचे मोबाईल कव्हर, शुभेच्छा पत्र वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन भगवान चौगुले यांनी केले तर नंदिनी घोगरे या दिव्यांग विद्यार्थीनीनं उपस्थितांचं आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा ओहोळ, भिमराव पाथरुड, विठ्ठल व्होरडे, संजय म्हमाणे, श्रीराम पाटील, नागेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे धाराशिव जनता बँकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले तर संस्था सचिवा लक्ष्मी इटकर, श्रीनिवास इटकर, संजीवकुमार इटकर, मुख्याध्यापक शकिल शेख यांनी धन्यवाद दिले.
