मुलींच्या शिक्षणाबद्दल तालुक्याची मान उंचावेल असं व्हावं शैक्षणिक कार्य : आमदार सुभाष देशमुख

shivrajya patra

किशोरी हितगुज मेळाव्यात 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियानाचा शुभारंभ

मंद्रुप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी शाळेप्रमाणे शैक्षणिक कार्य करत असताना मुलींच्या शिक्षणाबद्दल आपल्या तालुक्याची मान उंचावेल, अशा प्रकारचे शैक्षणिक कार्य करण्यात यावे. असं आवाहन माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप इथं तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी आमदार देशमुख आपल्या उद्घाटन आणि शुभेच्छापर संबोधनात बोलत होते. इयत्ता चौथी ची विद्यार्थीनी कुमारी शिवन्या स्वामी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती. 

याप्रसंगी विचारपीठावर उपसरपंच भगवान व्हनमाने, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी सर, ग्रामसेवक नागेश जोडमोठे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, रेवणसिद्ध मेंडगुदले, सिद्धलिंग म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री सुतार यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची प्रेरणा घेऊनच आज आपण सन्मानाने समाजात वावरत आहोत, असं प्रास्ताविकात सांगून गटशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री सुतार यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या क्रांतीकारी कार्याचा गौरव प्रास्ताविकात केला.

या मेळाव्यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या प्रेरणा मुलाखती, कर्तुत्ववान महिला चे व्यक्तिरेखा सादरीकरण,  काव्य वाचन स्पर्धा, गीत मंच कार्यक्रम, चालता-बोलता प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा, लेझीम नृत्य, योगा , खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या मेळाव्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुस्तकांचे बक्षीस वितरण केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी गुरबाळ सनके, सैपन आळगी, सर्व केंद्रप्रमुख, केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, केंद्राचे केंद्रप्रमुख हेळवी, मंद्रुप कॅम्पसचे मुख्याध्यापक कुंभार, श्रीमती शेंडे, श्रीमती तांबोळी व गटसाधन कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शबाना शेख व सुदर्शना नांदवटे यांनी केले तर मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुहासिनी शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

To Top