सोलापूर : येत्या 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये इयत्ता 12 वी ची परीक्षा आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता 10 वी ची परीक्षा होणार आहे. इयत्ता 10 वी साठी परीक्षा केंद्र 15 असून एकुण 188 परीक्षा केंद्रामधून 64, 454 विद्यार्थी आणि इयत्ता 12 वी साठी परीक्षा केंद्र 11 असून, एकुण 119 परीक्षा केंद्रामधून 54, 875 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत.
जिल्हाधिकारी (सोलापूर) व मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय 07 भरारी पथक तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर 03 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या वेळेत बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत. 
परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही, याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांनी दक्षता घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी दिली आहे.

