सोलापूर : वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवाईस न जुमानता मॉडीफाय सायलेंन्सर बसविलेल्या 525 वाहन चालकांच्या मॉडीफाय सायलेंन्सर कारवाईदरम्यान काढून घेतले होते. ते रोड रोलरखाली ठेऊन निकामी करण्यात आले. संबंधित वाहनधारकांनी ते निरोपयोगी सायलेंसर येत्या 10 दिवसात घेऊन जाण्याचं आवाहन सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक) सुधीर खिरडकर यांनी शुक्रवारी केलं आहे.
शहरात काही वाहन चालक हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन बुलेट अथवा इतर दुचाकी वाहनास कर्कश आवाज करणारे मॉडीफाय सायलेंन्सर बसविण्याच्या प्रकारामध्ये वाढ झालेली होती. 
अशा मॉडीफाय सायलेंन्सरच्या कर्कश आवाजामुळे जेष्ठ नागरीक, महिला, हॉस्पीटलमधील रुग्ण व शांतता प्रिय नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने अशा वाहनधारकांवर कारवाई गरजेची असल्याचे पुढं आले होते.
दंडात्मक कारवाई करुनही अशा वाहन चालकाकडून कारवाईस न जुमानता सायलेंन्सर वापर सुरुच असल्याने अशा कृत्यास प्रभावीपणे आळा घालण्यासाठी शेवटी दुचाकी वाहनांचे मॉडीफाय सायलेंन्सर काढून घेण्याची कारवाई करण्यात आलेली होती.
या कारवाईत गतवर्षी, 01 जानेवारी ते 17 एप्रिलदरम्यान शहर वाहतूक शाखा दक्षिण विभागाकडून 410 आणि उत्तर विभागाकडून 115 असे 525 काढून घेण्यात आलेले मॉडीफाय सायलेंन्सर नाश/निरोपयोगी करण्याबाबत वरिष्ठांची मान्यता घेण्यात आलेली होती.
वरिष्ठांच्या मान्यतेनुसार 22 जुलै रोजी शहर वाहतूक शाखा दक्षिण कडील 410 व उत्तर विभागाकडील 115 असे एकूण 525 मॉडीफाय सायलेंन्सर रोलर फिरवून निरोपयोगी करण्यात आले.
01 जानेवारी ते 17 एप्रिल 2025 दरम्यान च्या कालावधीतील ज्या वाहनधारकांचे वाहतूक शाखेकडून मॉडीफाय सायलेंन्सर काढून घेण्यात आलेले व ते निरोपयोगी सायलेंन्सर ज्या वाहनधारकांना पाहिजे आहे, अशा वाहन चालकांनी त्यांचे निरोपयोगी असलेले सायलेंन्सर 10 दिवसात शहर वाहतूक शाखेत संपर्क साधून घेऊन जावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित वाहन धारकांनी मुदतीत आपले निरोपयोगी सायलेंन्सर घेऊन न गेल्यास त्याची प्रशासकीय स्तरावर विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येईल, असंही सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक) खिरडकर यांनी कळविलं आहे.
