सोलापूर : शाळेची इमारत, संस्था व जागेची खरेदी न देऊन सचिन भागवत डोके यांची 01,30,00,000 रूपयांची फसवणूक करण्यात आलीय. हा प्रकार 30 मार्च 2024 पासून आजमिती दरम्यान ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक, मार्केट यार्ड शाखेत घडला. या प्रकरणी सुनिता सोजरनाथ पाटील यांच्यासह 10 आरोपींविरुध्द गुन्हा करण्यात आलाय. या गुन्ह्यामुळं शिक्षण संस्था खरेदी-विक्रीच्या वर्तुळात खळबळ उडालीय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उत्कर्ष शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ दोड्डी, संचलीत न्यु इंग्लिश स्कुल दोड्डी येथील जागा व इमारत संस्थाचालकांनी विकण्यास काढली होती. त्यानंतर 24 डिसेंबर 2022 रोजी संस्थेतील अध्यक्ष व वारसदार यांच्याशी सचिन भागवत डोके (वय-39 वर्षे, रा. दोड्डी) यांनी वरील संस्था जागा शाळेची इमारत विक्री-खरेदीसंबंधी बोलणी केली. त्यानुसार 30 मार्च 2024 रोजी कब्जे पावती व कुलमुखत्यार पत्र केले, त्यापोटी पाटील यांना 20 लाख रुपयांचा चेक दिला.
संस्थेचे अध्यक्ष व वारसदार यांच्यावर बँकेचे व खाजगी सावकारांचे कर्ज झाल्याने त्यांना मदत मागितली होती. म्हणून सचिन डोके यांनी त्यांना 26 लाख रुपये रोख दिलेले होते. तसेच सुनिता सोजरनाथ पाटील यांच्या सांगण्यावरुन त्यांचा मुलगा रविकांत सोजरनाथ पाटील यांना 31 मार्च 2023 रोजी ब्रम्हदेव दादा माने बँक शाखेचा चेक 24, 80, 000 रुपये दिले.
त्यानंतर 28 मार्च 2024 रोजी एकूण 58, 34, 400 रुपये दिले. असे एकूण 83,14,400 रुपये दिले. त्यानंतर नोटरीमध्ये 38, 30,173 रुपयांचा चेक दिला होता. त्यानंतर रविकांत सोजरनाथ पाटील यांच्या नावाने 20, 04, 227 रुपये इतक्या रकमेचा चेक दिल्याचं सांगण्यात आलंय. 
संस्थेतील सर्वांनी न्यु इंग्लिश स्कुल दोड्डी ही शाळा विकत देतो, असे सांगून व संस्थेचे चेंज रिपोर्ट मंजूर करुन देणे, जमिनीवर वारसाची नावे लावून देणे असे सांगुन एकूण 01, 30, 00, 000 रुपये घेऊन त्यानंतर जमिनीची मोजणी करुन वारसाची नावे लावणे व खरेदीखत करुन देतो, असे सांगून आजपर्यंत फिर्यादीस जागेची खरेदी करुन दिली नाही. वरील कामे न करुन देता विश्वासघात करुन फसवणूक केल्याची फिर्याद सचिन डोके यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलीय.
त्यानुसार सुनिता सोजरनाथ पाटील, रविकांत सोजरनाथ पाटील, ज्ञानेश्वर भारत पाटील, शामकांत बाबुराव शिंदे, मोहन धोंडीबा सुरवसे, तुकाराम भारत पाटील, संभाजी राजकुमार गायकवाड, प्रियांका सोजरनाथ पाटील, प्रीती सोजरनाथ पाटील आणि आकाश सोजरनाथ पाटील या आरोपीविरुध्द भा. न्या. संहिता कलम 318,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आहे. पोलीस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.
