'सुसाईड नोट' ने मिळवून दिला धनीवाले पिता-पुत्राना न्याय

shivrajya patra

सोलापूर : अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या पिता-पुत्रांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईट नोट (चिठ्ठी) ने  न्याय मिळवून दिला.  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने रामसिंग धनीवाले व संतोष धनीवाले या पिता-पुत्रांची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची हकिकत अशी की, धनीवाले पिता-पुत्रांविरुद्ध एका अल्पवयीन मुलीने दोन केसेस दाखल केले होते. त्या केसेस काढून घेण्यासाठी धनीवाले पिता-पुत्र त्या अल्पवयीन मुलीला दमदाटी देत होते आणि त्या दमदाटीला कंटाळून 'त्या' अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप 'त्या' अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत केला होता.

पोलिसांनी घटनाथळाचा पंचनामा करताना त्या मुलीने लिहिलेली सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली.  ती पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी धनीवाले पिता-पुत्रांना अटक केली.  त्यांचा जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने नामंजूर केल्यानंतर दोन्ही आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

त्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मयत मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (चिठ्ठी) मध्ये आरोपीच्या नावाचा उल्लेख देखील नाही.  

केवळ पुर्व वैमनस्यावरुन 'तिच्या'  वडिलांनी धनीवाले पिता-पुत्रांना खोटेपणाने गुंतवले आहे.  आत्महत्येच्या प्रकरणात छळाच्या पुरावा असणे जरुरीचे असते.

या प्रकरणातील मयताच्या सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख नाही, याची दखल घेऊन न्यायमुर्तींनी धनीवाले पिता-पुत्राची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने तर सरकारतर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.

To Top