सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्य शासनाने मंगळवारी घेतलेला निर्णयाने बहुतांश मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यामुळं तो निर्णय म्हणजे 'कहीं खुशी, कहीं गम' असा असल्याची प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे शिवश्री राम गायकवाड यांनी सामाजिक माध्यमावर व्यक्त केलीय.
हैद्राबाद आणि सातारा गॅझेटमधील संदर्भ घेऊन त्यातील कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी असलेल्यांचा समावेश ओ.बी.सी. संवर्गात होणार असून ज्यांच्या नोंदी फक्त मराठा म्हणून आहेत, तो समाज बांधव मात्र आरक्षणापासून वंचित राहणार आहे, असं मत शिवश्री राम गायकवाड यांनी व्यक्त केलंय.
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मराठा समाजाचे पुर्वज आपली जात नमूद करताना कुणबी न करता मराठा म्हणून केली आहेत. कांहीचं तीन-चार पिढ्यापूर्वी स्थलांतर झालं आहे. त्यामुळे आपली निजामकालीन किंवा स्वराज्य (सातारा) संस्थानकालीन मुळ गावाचा थांगपत्ता नाही.
न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार सरसकट मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समावेश करून आरक्षण दिले असते, तर नक्कीच फायदेशीर ठरले असतं. आजच्या निर्णयानुसार बहुतांश मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यामुळं हा निर्णय म्हणजे 'कहीं खुशी, कहीं गम' ठरणार आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
