मोहोळ/विष्णु शिंदे : राज्यात ओबीसी च्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी सक्रिय राहून ताकतीने उतरतील, असे प्रतिपादन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केले आहे.
पंढरपूर येथे पार पडलेल्या माळी महासंघाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरास राज्यातील सत्तावीस जिल्हामधून आलेल्या सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांचे माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे होते. 
यावेळी राज्यातील माळी समाजाची सद्यस्थिती, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये माळी समाजाचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर रद्द करणे अथवा दुरुस्त करणे, याबाबत जनजागृती करणे, राज्यस्तरावर होणाऱ्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, माळी महासंघाचा अधिक विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे आदी विषयावर सखोल चर्चा व चिंतन करण्यात आले, आणि निर्णय घेण्यात आले. 
आज देशामध्ये माळी समाजाचा एक मुख्यमंत्री, राज्यामध्ये माळी समाजाचे तीन मंत्री, अनेक आमदार, कार्यरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिका या निवडणुकांमध्ये समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी रणनीती ठरवण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महासचिव रवींद्र आंबेडकर, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काळुराम गायकवाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गायत्री लडकत, सांगोला माजी नगराध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, माजी जि. प. सदस्य हरिभाऊ गांवधरे, श्रीकृष्ण गोरडे प्रदेश कोषाध्यक्ष, चंद्रशेखर दरवडे , मुरलीधर भुजबळ , मुकुंद पोटदुखे , दीपक जगताप (पुणे), राजेश जावरकर , दिनेश टाकरखेडे, संतोष जमदाडे, रीमा लडकत आदी राज्यभरातून आलेले प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे, विश्वस्त भारत माळी यांनी प्रयत्न केले .
