गुरुकुलात नाही, थेट गुरुंच्या घरीच सन्मान !; शाळेच्या चौकटीबाहेरचा उपक्रम
शिक्षणाधिकाऱ्यांनी घरीच केला शिक्षकांचा गौरव”
शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आगळावेगळा उपक्रम
सोलापूर : “शिक्षक हे फक्त अभ्यास शिकवणारे नसतात, तर ते समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या योगदानाशिवाय कुठलीच प्रगती शक्य नाही. त्यामुळे शिक्षकांना योग्य मान-सन्मान देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.” असं जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी म्हटले.
05, सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षण साजरा होतो. शिक्षक दिन म्हटलं की, शाळेत होणारे कार्यक्रम, मंचावर होणारा सत्कार आणि औपचारिक शुभेच्छा हेच चित्र डोळ्यासमोर येते, मात्र यंदा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी या चौकटीबाहेर जाऊन एक वेगळा व हृदयस्पर्शी उपक्रम राबवला. त्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला अन् शिक्षक दिनाला खरा-खुरा ‘आदरदिन’ बनवला.
या उपक्रमात गणपती थावरू पवार (जि.प.प्राथमिक कन्नड मुलींची शाळा, दुधनी, ता. अक्कलकोट), मेहमूद नवाज अब्दुल मजीद जागीरदार (जि. प. उर्दू शाळा, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर), लक्ष्मण सुखदेव उकिरडे (जि. प. शाळा, सोमनाथनगर, तसेच सौ. वैशाली संजय मेलगिरी (लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा, मराठी माध्यम) या शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांना शाल, गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षक गणपती पवार आणि मेहमूद जागीरदार यांनी “२४ वर्षे सेवा केली,पण घरपोच सन्मान करणारे पहिलेच शिक्षणाधिकारी आम्ही पाहिले.”असे मत व्यक्त केले.तर सौ. मेलगिरी आणि उकिरडे यांसारख्या तरुण शिक्षकांचे समर्पणही कौतुकास्पद ठरले. शिक्षकांच्या दारात जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कारसोहळा पाहून शिक्षक देखील आनंदी झाले.
या विशेष भेटीच्या वेळी मुख्यालयातील विस्तार अधिकारी हरीश राऊत, दफेदार सर, सुदर्शन राठोड हेही उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ शिक्षकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांच्या डोळ्यात दाटलेले समाधानाचे अश्रू, आणि समाजाकडून मिळालेला मान यामुळे शिक्षक दिनाची खरी उंची अधोरेखित झाली.
