सोलापूर : स्टेजला परवानगी नाकारल्याच्या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसेना जिल्हा पातळीवरील नेते मनिष काळजे आणि समर्थकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सात रस्ता येथील शिवसेना भवन समोर गुरुवारी रात्री 10.30 वा. घडला. आरोपीतांमध्ये काळजेंसह प्रमुख 07 आणि इतर 50 ते 60 जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सात रस्ता येथील शिवसेना भवन सेवालयासमोर स्वागत कक्षासाठी अनाधिकृत व बेकायदेशीर उभा केलेला स्टेजला काढण्यासंबंधी सूचित करण्यात आले होते. त्यावेळी मनिष काळजे यांनी जाणीवपूर्वक १२x२४ फुटाचा लोखंडी पाईप व त्यावर प्लायवूड टाकून स्टेज उभारला होता, असा पोलिसांचा आरोप आहेे.
तो स्टेज काढणार नाही, अशी हटवादी पवित्रा घेत, सुमित मन्सावाले आणि वेणु श्रीनिवास या काळजे समर्थकांनी पोलीसांशी हुज्जत घातली व स्टेज न काढण्याची भूमिका घेतली.
काळजे समर्थकांनी पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन करून फोन करून परिसरातील नागरीकांना बोलावून घेऊन चिथावणी देत, रस्त्यावरील रहदारी व वाहतुकीस अडथळा व्हावा, म्हणून 'रास्ता रोको' करीत सार्वजनिक रस्त्यावर बसले. त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधी घोषणाबाजी करीत होते.
त्यावेळी पोलिसांनी पी ए सिस्टीमवर आवाहन केले होते. मनिष काळजे व त्यांच्या साथीदारांनी पोलीसांशी हुज्जत घालून धक्का-बुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या जमावाने पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लघंन केले असल्याची फिर्याद पोलीस हवालदार/214 जाधव यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी मनिष काळजे, सुमित मन्सावाले, वेणु श्रीनिवास, मुस्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे आणि जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व 50 ते 60 लोकांविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ढवळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
