गांधीवादी ज्येष्ठ नेत्या काळाच्या पडद्याआड ! माजी आमदार निर्मला ठोकळ यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर/ 16 सप्टेंबर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, दिवंगत माजी खासदार तुळशीदासदादा जाधव यांच्या कन्या, येथील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मला शंकरराव ठोकळ (वय- 87 वर्ष ) यांचं मंगळवारी, सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.  त्यांचं पार्थिव मुरारजी पेठ येथील तोरणा बंगला येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वदूर 'ताई' अशी ओळख असलेल्या निर्मला ठोकळं या गांधीवादी विचारांच्या नेत्या अशी ओळख अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवली. 

निर्मला ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली होती. त्यांचा सहज-सरळ स्वभाव, लोकाभिमुख कार्यपद्धती व महिलांच्या प्रश्नांवर वेळोवेळी घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यांत प्रभाव होता.

सन 2006 साली सोलापुरात झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या. हे संमेलन सोलापुरात भरविण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी हे संमेलन यशस्वी करून दाखवले. त्यावेळी त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. त्यांनी विधानसभा व विधान परिषदेतही काम पाहिले आहे. 

माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या  निर्मलाताई ठोकळ यांचा जन्म 24 एप्रिल 1938 रोजी  झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि खासदार स्व. तुळशीदास दादा जाधव यांच्या निर्मला ठोकळ या कन्या... !

(छायाचित्रं शिवभार : ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी)

सोलापूर महानगरपालिकेत 1962 ते 1967 आणि 1969 ते 1974 अशा दोन टर्म त्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. 1972 ते 1978 या कालावधीत त्यांची विधानसभेवर निवड झाली तर 1982 ते 1988 या कालावधीत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या. विधान परिषदेच्या आश्वासन समितीचे प्रमुख म्हणून तसेच पंचायत राज व अन्य समित्यांवर देखील त्यांनी काम केले. 

(छायाचित्रं शिवभार : ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी)

सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी 1975 ते 1984 या कालावधीत काम पाहिले. 1968 पासून ते दीर्घकाळ इंदिरा महिला जीवन विकास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या त्या चेअरमन होत्या.

महिला प्रबोधिनी या मासिकाच्या संस्थापक संपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. 1992 ते 1998 या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील त्या संचालक राहिल्या आहेत. 2004 ते 2006 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या त्या उपाध्यक्ष होत्या. 

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी स्व. कलावती या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तर त्यांचे पुत्र उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले हे त्यांचे भाचे होत. त्यांच्या पश्चात ॲड. विपीन व सचिन ही दोन मुले, डॉ. सुनिता व शिल्पा या सुना व नातवंडे असा परिवार आहे.




(अधिक छायाचित्र शिवभार : MH 13)

सायंकाळी पुणे नाका, बाळे स्मशानभूमीत निर्मला ठोकळ यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चिरंजीव सचिन ठोकळ यांनी मुखाग्नी दिला. याप्रसंगी प्रा. सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, मनोहर सपाटे, अलका राठोड, दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, किशोर पाटील, प्रताप चव्हाण, अजय दासरी, करिमुन्नीसा बागवान, प्रमिला तूपलवंडे, अॅड सुरेश गायकवाड, बसवराज सलगर, मिलिंद थोबडे, मोहन डांगरे, रामचंद्र आलुरे, सुधीर खरटमल, अॅड. नितीन हबीब, श्रीधर रिसबूड, चंद्रकांत रेम्बरसू, रविंद्र नागणकेरी, लता फुटाणे, मुकुंद जाधव, आरिफ शेख, किशोर चंडक, दिलीप कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती बरबडे, डॉ. किरण पाठक, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सुधा अळळीमोरे, अॅड. दीपक महिंद्रकर, महेश गादेकर, रवि हलसगीकर, अमोल धाबळे, जितेश कुलकर्णी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



To Top