बांधकाम कामगारांना योजनेचे लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा: कामगार मंत्र्यांना संघर्ष समितीचे निवेदन

shivrajya patra

सोलापूर : बांधकाम कामगारांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्या, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना मुंबई येथील, मंत्रालयात संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी, सेक्रेटरी सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.

संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळण्यास अनंत अडचणी आल्याने, कामगार लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, याकडे कामगार मंत्री या नात्याने आपण महामंडळ व जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त शासकीय यंत्रणेकडे विशेष लक्ष देऊन, या अडचणी दूर कराव्यात, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली.



बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या : 

१. बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण व विविध लाभ केवळ १५० पर्यंत केलेली मर्यादा रद्द करून पूर्वीप्रमाणे खुले करावे

२. नोंदणी झालेल्या नूतनीकरणासाठी महामंडळ एक रुपया फी भरणार, असे जाहीर केले. परंतु ती एक रुपया फी अद्यापही महामंडळ अदा केले नाही. त्यामुळे अनेक कामगारांचे नूतनीकरण थांबलेले आहे. त्यामुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ती फी अदा करून कामगारांना न्याय द्यावा.

३. गृह वस्तू, भांडी संच वाटपाची तारीख दिली जाते. ती तारीख साईट बंदच्या नावाखाली कामगारांना हेलपाटे करावे लागत आहे, म्हणून पूर्वीप्रमाणे अमर्यादित खुले करावे.

४. भांडी संचामध्ये घोटाळा होत असल्या कारणाने भांडी कमी येणे व कमी दर्जाची भांडी वाटप होत आहे. यासाठी विशेष नियम करून पूर्वीप्रमाणे भांडी वाटप करावे.

५. बोगस कामगार नोंदणी थांबविण्यासाठी तपास समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने केवळ फक्त एक वेळा दौरा केला. त्यानंतर समितीचे काम बंद आहे. तरी पूर्ववत चालू करावे, अशा मागण्याचा समावेश आहे. नमूद करण्यात आले आहे.

विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख, वैशाली बोड्डू, रेखा आडकी,  गणेश बोड्डू, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, अंकुश चव्हाण सहभागी होते.       

To Top