सोलापूर : समाजात समता आणि बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजिक ऐक्य, शांतता आणि राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे कार्य करीत असलेले जन्मेजयराजे भोसले, आमदार विठ्ठल कटकधोंड, अॅड. यु. एन. बेरिया, सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट आणि प्रार्थना फाउंडेशन यंदाच्या जॉईन फॉर पीस शांतता पुरस्कार 2025 चे मानकरी आहेत. जागतिक शांतता दिनी रविवारी, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा उर्दू घर इथं आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी दिलीय.
मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करीत असलेली स्वयंसेवी संस्था अशी जॉईन फॉर पीस ची ओळख आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे मानवाधिकारांची जपणूक करणे आहे. समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधूभाव वृद्धिंगत होण्यासाठी जॉईन फॉर पीस संस्था प्रयत्नशील आहे.
याचाच एक भाग म्हणून 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता, बंधुता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजिक ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील 06 वर्षापासून "JP शांतता पुरस्कार " ने सन्मानीत करण्यात येत आहे.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि इतिहास तज्ञ, प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल. या सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि सचिव प्रा. जैनोद्दीन पटेल यांनी केलं आहे.
... हे आहेत यंदाच्या JP शांतता पुरस्काराचे मानकरी !
श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, विजयपूर जिल्ह्यातील नागठानचे आमदार विठ्ठल कटकधोंड, सोलापूरचे माजी महापौर अॅड. यु. एन. बेरिया, सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट आणि प्रार्थना फाऊंडेशन यांची निवड झालेली आहे. सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
