१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उच्च शिक्षणासाठी विविध योजनांची प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय वसतिगृह प्रवेश, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी तसेच एम.ए., एम.एस्सी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यामध्ये प्रवेश घेतल्यास https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दिनांक १ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अर्ज सादर करता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात १०० क्षमतेचे मुला व मुलींसाठी प्रत्येकी एक शासकीय वसतिगृह कार्यरत असून, प्राप्त अर्जांनुसार गुणवत्तेनिहाय निवड यादी १७ ऑक्टोबर रोजी व योजनांची अंतिम यादी २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यासाठी):
| टप्पा | दिनांक |
| अर्ज सादरीकरण | १ ते १८ सप्टेंबर २०२५ |
| अर्ज छाननी | १९ ते २४ सप्टेंबर २०२५ |
| पहिली निवड यादी | २५ सप्टेंबर २०२५ |
| प्रवेश अंतिम मुदत | ६ ऑक्टोबर २०२५ |
| दुसरी निवड यादी | ९ ऑक्टोबर २०२५ |
| दुसऱ्या यादीतील प्रवेश अंतिम मुदत | १७ ऑक्टोबर २०२५ |
शासकीय वसतिगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यांसाठीही स्वतंत्र वेळापत्रक लागू असून त्यानुसार अर्ज छाननी २४ ते ३० ऑक्टोबर, निवड यादी ३१ ऑक्टोबर, प्रवेश अंतिम मुदत १० नोव्हेंबर असेल.
वसतिगृहातील रिक्त जागांची सद्यस्थिती (२९ ऑगस्ट २०२५):
मुलांचे वसतिगृह: - मंजूर जागा: १०० - भरलेले: २५ - रिक्त: ७५
मुलींचे वसतिगृह: - मंजूर जागा: १०० - भरलेले: ३२ - रिक्त: ६८
प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार इमाव, विजाभज, विमाप्र, दिव्यांग, अनाथ, EWS व विशेष बाब प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे.
