सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस ट्रेनिंग स्कूलमधील पोलीस ट्रेनिंग घेत असलेल्या 170 पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ट्रेनिंग स्कुलचे अधिकाऱ्यांनी ताबडतोब विषबाधा झालेल्या पोलिसांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
सामायिक अन्न-पदार्थांच्या सेवनामुळे ही घटना झाल्याची माहिती समोर आली आहे . या घटनेमध्ये पोटदुखी आणि मळमळ यासारखी लक्षणे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.विषबाधा झालेले सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस शुद्धीवर आहेत.
सोलापूर पुणे महामार्गावर केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. राज्यात विविध जिल्ह्यात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. सद्यस्थितीत साडेतेराशे पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. 
विषबाधा झालेले सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस सुखरूप असून उपचार सुरू आहेत, असं पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्घटनेसंबंधी माहिती देताना सांगितले.




