खळबळजनक... ! परराज्यात चाललेल्या टेंपोत आढळल्या एक हजाराहून अधिक प्लाझ्मा बॅग

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहरातून रक्त आणि प्लाझमा ची इतरत्र तस्करी होत असल्याच्या बातम्या अधून-मधून पहायला मिळत होत्या. बुधवारी दुपारी सदर बझार पोलीस ठाण्यात आणलेल्या  परराज्यातील मालवाहू टेंपोत 01 हजाराहून अधिक प्लाझ्मा बॅग असल्याचे आढळून आल्यानं खळबळ उडालीय. त्यामुळे शहरातील रक्त आणि प्लाझ्माच्या तस्करीला पुष्टी मिळालीय. हा प्लाझ्मा शेजारच्या गुजरातेतील अहमदाबादच्या इंटास फार्मा कंपनीकडं जात होता, अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीनंतर जे सत्य पुढं येईल, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर शहरात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलित होणारे रक्त, संकलित करणाऱ्या काही ब्लड बँका, शहर व जिल्ह्यातील रक्ताची गरज दुर्लक्षित करून तसेच कायद्याची चौकट ओलांडून तस्करी करीत असल्याच्या बातम्या अधून मधून झळकत होत्या. या बातम्यांकडं अन्न व औषध प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत होते.

सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सात रस्ता चौकात GJ 38/TA6316 क्रमांकाचा टेंपो थांबविला. त्यावेळी त्या वाहनातील इंटास कंपनीच्या कर्मचाऱ्यानं आमच्याकडं देशभरातून प्लाझ्मा संकलनाचं 'लिगली' परमिशन असल्याचं सांगून घोडं दामटण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी  गर्दीचा चौक अशी ओळख महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ गर्दी जमा झाल्यावर 112 मदत  क्रमांकाच्या पोलिसांनी तो टेंपो सदर बझार पोलीस ठाण्यात आणला.

प्लाझ्मा वाहतुकीत गुंतलेला GJ 38/TA6316 क्रमांकाचा टेंपो पोलीस ठाण्यात असल्याची माहिती मिळाल्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी इंटेक्स कंपनीचा प्रतिनिधी आणि चालकाकडे चौकशी करून पक्ष पाहणी केली असता 34 बॉक्स मध्ये प्रत्येकी 30 बॅग असल्याचे आढळून आले. अगदी बटाटा-टमाटा मालाप्रमाणे नेला जाणे, प्लाझ्मा वाहतुकीची पद्घत वैद्यकीय नियमात अयोग्य आहे, असं आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी सांगितले.

ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे हा प्रकार संबंधितांना कळविण्यात आलेला आहे. ते यासंबंधीची कागदपत्रांची पडताळणी करतील, त्यात काही गैर आढळलं तर कंपनी आणि वाहन चालकाविरुद्ध कायद्याच्या चौकटीत बसणारी कारवाई करण्यात येईल, असं आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी म्हटले.

सोलापूर शहरातील रुग्णांना संकटसमयी प्लाझ्मा उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी प्लाझ्मा शहराबाहेर जाणे गैर आहे. या वाहनात आढळलेल्या बॅग या मेडिकेअर ब्लड बँकेतून भरल्या असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढं आले आहे. सामान्य नागरिकांच्या मनात रक्त वा प्लाझ्माची तस्करी होत असल्याचा यापूर्वीपासूनच संशय आहे. या घटनेने सोलापूर शहरातील ब्लड बँकांचा 'कारभार ' ऐरणीवर आला आहे.

(इन्टास फार्माचं ओळखपत्र)

'लीगल परमिशन' ची भाषा बोलणाऱ्या इंटास फार्मा कंपनीला सोलापुरातून प्लाझ्मा घेऊन जाण्याचं लीगल परमिशन आहे का हा चौकशी आणि पडताळणीचा भाग आहे, सूर्य अस्ताकडे जात असतानाही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सदर बझार पोलीस ठाण्याकडे फिरकल्याचे दिसून आले नाही. त्यांच्या चौकशीनंतरच हा प्रकार तस्करीचा आहे किंवा कसं याचा उलगडा होणार आहे.

दोन विभागाच्या चौकशीत समन्वयाचा अभाव

सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी डॉक्टर रेखा माने यांनी हा प्रकार अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविला, त्यावेळी गोडसे नावाचे अधिकारी शहराबाहेर असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तो टेम्पो न पाहिल्याने हे कायदेशीर की प्लाझ्माची तस्करी याचा उलगडा झालेला नाही, मात्र सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अन्य व औषध प्रशासनाच्या कामात समन्वय नसल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे. सोलापूर महानगरपालिकेचे डॉ. पल्लेलू यांनी हा प्लाझ्मा सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

To Top