शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी ! शासनाचा महसूल विभाग 'सेवा पंधरवडा' त तालुक्यात राबविणार रस्त्यांसंबंधी विशेष मोहीम

shivrajya patra

मोहोळ : शासनाचा महसूल विभाग, या वर्षी नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' आयोजित करणार आहे. ज्याचं उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देणे हे आहे. ही मोहीम शेतकरी समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा शासनाला विश्वास आहे.

महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि समस्यांना प्राधान्य देत असतो. एक विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाचा एक प्रमुख आणि महत्त्वाकांक्षी टप्पा म्हणजे पाणंद रस्ते विशेष मोहीम हा आहे.

शासनाने ग्रामीण रस्त्यांचे सर्वेक्षण, मोजमाप व अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचता यावे व गावोगावी रस्त्यांची नोंद व्यवस्थित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

तहसीलदार यांच्या आदेशानुसार 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार तालुका व गावपातळीवरील समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांना रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन व नोंदी अद्ययावत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

या गाव नकाशावरील विद्यमान तसेच नोंद नसलेले रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार होईल. ग्रामसभेत मान्यता घेऊन ठराव पारित झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने जिओ-रेफरन्सिंगसह रस्त्यांचे सीमांकन केले जाणार आहे.

ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळेल त्या ठिकाणी नोटिसा देऊन सुनावणी घेतली जाईल व आवश्यक असल्यास अतिक्रमण हटवले जाईल. प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देऊन नोंदी गाव दप्तरात अद्ययावत करण्यात येतील. ही मोहीम मोहोळ, अनगर, शेटफळ, सावळेश्वर, पेनूर, नरखेड, वाघोली, टाकळी सिकंदर व कामती या महसूल मंडळांमध्ये राबवली जाणार आहे. 

मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व भूमी अभिलेख अधिकारी यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास पोलीस बंदोबस्ताचाही वापर केला जाईल, असं मोहोळ तहसील कार्यालयानं एका प्रसिध्दी पत्रकान्वये गुरूवारी सांगितलंय.

पाणंद रस्ते विशेष मोहिमेचे उद्दिष्ट आणि महत्त्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहजतेने आणि वेगाने पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच, राज्य शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा, यासाठी आग्रही आहे. या उद्देशाने, विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून एक समग्र योजना आणली जाणार आहे. हे सर्व काही पाणंद रस्ते विशेष मोहीम अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांच्या मुळातील समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय, ही मोहीम शेतीच्या उत्पादन क्षमतेवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करेल अशी शासनाची अपेक्षा आहे, असंही मोहोळ तहसिलदार यांनी म्हटलं आहे.

To Top