बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर 'एक्साईज' ची धाड; 12,70,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंदनगरात टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीचा अवैध विदेशी मद्य साठा व बनावट देशी-विदेशी मद्य निर्मितीचा कारखाना उजेडात आला. मंगळवारी, 02 सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात जवळपास 12,70,320  रूपयांचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर ही एक्साईज ची मोठी कामगिरी मानली जात आहे.

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग यांच्या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या धाडीत, गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या 750 मिलीच्या 936 सिलबंद बाटल्या, 180 मिलीच्या 192 सिलबंद बाटल्या तसेच बनावट देशी मद्याच्या 90 मिलीच्या 8,900 सिलबंद बाटल्या व विविध ब्रँडची 1,500 बनावट लेबल व 9,500 बनावट बुचे, विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, असे बनावट मद्य निर्मितीचे साहित्य असा 12,70,320  रूपयांचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिशुपाल धनु राठोड फरार असून त्याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलाय.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपलेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 249 गुन्हे नोंद करुन 233 जणांवर कारवाई केली. एक्साईज ने शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 80,660 लि. रसायन, 5880 लि. हातभट्टी दारु, 400 लि. बनावट देशी मद्य, 106 लि. बनावट विदेशी मद्य. 47 लि. बनावट बिअर, 1924 लि. ताडी, तसेच 12 वाहनांसह 50,81,091 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अशा प्रकारची अवैध हातभट्टी दारु व ताडी विक्रीवर कारवाई करण्या करीता विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

ही कामगिरी निरीक्षक ओ. व्ही. घाटगे, आर. एम. चवरे तसेच दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सुखदेव सिद, शिवकुमार कांबळे, धनाजी पोवार, सचिन शिंदे, रमेश कोलते, राम निंबाळकर श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान सर्वश्री, तानाजी जाधव, कपिल स्वामी, नंदकुमार वेळापूरे, चेतन व्हनंगुटी, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, अण्णासाहेब फड, वसंत राठोड, महिला जवान शिवानी मुंढे, तसेच वाहनचालक दिपक वाघमारे, सानप, दिपाली सलगर यांनी पार पाडली. समाधान शेळके या  गुन्ह्याचा अधिक तपास  करीत आहेत.

... नांव ठेवू गुप्त; 'एक्साईज' ने आवाहन !

अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतुक विरोधात यापुढेही कारवाई चालू राहणार आहे. अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचं तांव गुप्त ठेवले जाईल, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केलं आहे.

To Top