रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

shivrajya patra

सोलापूर : ग्रामीण भागातील राहणाऱ्या विद्यार्थी शिक्षण आणि युवक विकासासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी हे नेहमी सातत्याने कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून सलगर बुद्रुक येथील विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर  कॉलेजच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अकबर नदाफ यशस्वीरीत्या आयोजन करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींबाबत समर्पक व प्रेरणादायी माहिती देण्यात आली.

या सत्रात रोटे. नदाफ यांनी कला, वाणिज्य, विज्ञान शाखा, डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यासारख्या विविध पर्यायांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, कौशल्यांनुसार आणि दीर्घकालीन उद्दिष्टांनुसारच शैक्षणिक शाखा निवडावी, याबाबत आवर्जून उद्देश दिला. दहावीनंतर कोणती शाखा निवडावी, याबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज आणि संभ्रम दूर केले.

ते म्हणाले की, प्रत्येक शाखेत उत्तम संधी आहेत, फक्त योग्य दिशेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे गेल्यास यश नक्की मिळते. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःच्या आवडीला प्राधान्य द्यावं, यासोबतच त्यांनी स्थानिक शिक्षणसंस्था, पुढील अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, आणि शिष्यवृत्ती यासारख्या व्यवहार्य बाबींचाही आढावा घेतला. या कार्यक्रमाला एकूण ९३ विद्यार्थी उपस्थित होते. सत्रानंतर काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनही देण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाचा प्रारंभ प्राचार्य अशोक जाधव यांच्या स्वागतपर भाषणाने झाला.  प्रा. विश्वनाथ ढेपे यांनी रोटरी क्लबचे आभार मानले आणि कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. रोटे. भारत कदम यांनी शेवटी आभार मानले.

To Top