अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी तरुणाची 'एमपीडीए' अन्वये कारागृहात रवानगी

shivrajya patra

सोलापूर : येथील जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज राजु जेनुरे या 27 वर्षीय तरुणास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

भवानी पेठ, मड्डीवस्ती येथील रहिवासी पंकज जेनुरे, मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू-सुरा, लोखंडी पाईप-काठ्या यासारख्या जिवघेण्या घातक शस्त्राने ईच्छापुर्वक दुखापत करणे, घरफोडी-मोटार सायकल चोरी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, दगडफेक करणे आणि घातक शस्त्राने धमकाविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या दप्तरी त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे 08 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. जेनुरे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

पंकजला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2020 मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. 

त्यामुळे त्याच्या कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी 29 ऑगस्ट रोजी त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले. त्यास स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आलं आहे.

To Top