सोलापूर : सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाच्या वतीने चित्रकला ग्रेड परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शहर व ग्रामीण स्तरावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबिर रविवारी, 31 ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिरात सकाळी 09 वाजता तर रविवारी, 07 सप्टेंबर रोजी जुळे सोलापुरातील कै. वि. मो. मेहता प्रशालेत सकाळी 09 वाजता आयोजित करण्यात आलं आहे.
या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेची सखोल माहिती देणे, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करणे हा आहे. चित्रकला ग्रेड परीक्षा ही महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये घेतली जाते.1860 मध्ये जुन्या मुंबई प्रांतात या परीक्षेची सुरुवात झाली. 
या परीक्षेला विशेष महत्त्व असून, यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळतात. 'ए' ग्रेडसाठी 7 गुण, 'बी' ग्रेडसाठी 5 गुण आणि 'सी' ग्रेडसाठी 3 गुण दिले जातात. तसेच, या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळवणे सोपे होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांना चित्रकला ग्रेड परीक्षेतील विविध विषय जसे की, वस्तू चित्र, स्मरण चित्र, संकल्प चित्र, कर्तव्य भूमिती, अक्षर लेखन आणि घन भूमिती याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. यासाठी शेरशहा डोंगरी, शशिकांत सदाफुले, शांतप्पा काळे, संतोष धारेराव, सिद्धाराम काळे, सोमशंकर म्हेत्रे, स्वाती साठे आणि स्नेहल गुंगे तसेच सर्व संघटनेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत-जास्त कला शिक्षक, कलाप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले यांनी केलं आहे.
