मराठा आरक्षणाकरिता सोलापूरकरांची झाली तयारी पूर्ण; गुरूवारी सकाळी निघणार ताफा
सोलापूर : मराठा आरक्षणाकरिता 29 ऑगस्ट रोजी मुंबईला रवाना होण्याकरिता सोलापुरातील लाखो समाज बांधवांची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी सकाळी दहा वाजता सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठ्यांचा तापा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत तत्पूर्वी बुधवारी रात्री विनोद भोसले, गणेश डोंगरेयांच्या सह शेकडो मराठा बांधव सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईला रवाना झाले.
सिद्धेश्वर एक्सप्रेस ने रवाना झालेले मराठा मावळे विविध घोषणा देत रेल्वे स्टेशन वरती दाखल झाले होते. 'घरात बसला... तो मराठा कसला?', 'कोण म्हणतय देत नाय..आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाय', 'आता कुठे जायचं, मुंबईला जायचं' अशा विविध घोषणा देत उपस्थित मावळ्यांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला होता.
सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांच्या वतीने मोर्चात निघणाऱ्या वाहनाकरिता स्टिकर आणि भगव्या टोप्या आणि टॉवेल यांची वाटप करण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सग्या सोयऱ्यांचा जीआर काढण्यात यावा, अशा मागण्याकरिता मराठा समाजाच्या वतीने मुंबईच्या दिशेने आगेकूच करण्यात येत आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून लाखो मराठा बांधवांसह किमान 25, 000 वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होती. या वाहनांमध्ये मोटरसायकल, जीप, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, ॲम्बुलन्स, पाण्याचे टँकर अशा हजारो वाहनांचा समावेश असणार आहे.
...चौकट
गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलनासाठी सर्व समाज बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. शहरातील चार हुतात्मा, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, या महापुरुषांना अभिवादन करून सर्व समाज बांधव दुचाकी व चार चाकीने मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, असं सांगण्यात आलंय.
