हातमागाद्वारे वस्त्र निर्मिती सोलापूरची वैभवशाली परंपरा : वारसा फेरीचं आयोजन

shivrajya patra

हातमाग केंद्रास भेट; इंटयाक सोलापूर विभागातर्फे राष्ट्रीय हातमाग दिनी स्तुत्य उपक्रम

सोलापूर : शहरात अजूनही सुस्थितीत असलेल्या हातमाग केंद्र मागाद्वारे वस्त्र निर्मितीची उज्वल परंपरा होय म्हणून अद्यापही उत्तम चालू स्थितीत असलेल्या अशा हातमाग केंद्रास भेट देऊन वारसा फेरीचे आयोजन करण्यात आले. इंटयाक सोलापूर विभागातर्फे एकूणच ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन याचे कार्य करीत असतानाच या मालिकेमधील ही हातमाग केंद्र भेट- 'वारसा फेरी' च्या माध्यमातून हातमागाद्वारे विविध प्रकारची वस्त्र निर्मितीची शास्त्रोक्त व तांत्रिक माहिती घेण्यात आली. 

नुकताच साजरा झालेल्या राष्ट्रीय हातमाग दिनाप्रित्यर्थ इंटयाक सोलापूर विभागातर्फे हातमागाद्वारे वस्त्रनिर्मिती बाबत वारसा फेरीच आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे अडीच तास चाललेल्या या वारसा फेरीमध्ये, त्याचा असलेला इतिहास, सद्यस्थिती वस्त्र निर्मितीमधील बदलते स्वरूप, रासायनिक अंगाने असणारे रंग, सूत प्रकार, प्रक्रिया इत्यादीतील बदल व त्याचबरोबर विविध कौशल्याद्वारे होणारी वस्त्र निर्मिती इत्यादी बाबत सखोल माहिती या हातमाग केंद्र उद्योजकांमार्फत देण्यात आली. 

सकाळी सुरू झालेली ही वारसा फेरी पूर्व भागातील विविध केंद्र भेट देताना, नागनाथ मादगुंडी, श्रीनिवास अनंतुलु, सुदर्शनअनंतुलु, राजेशाम सादुल या उद्योजकांनी त्यांच्या स्वतःच्या हातमाग केंद्र व वस्त्र निर्मिती उद्योग संदर्भात माहिती दिली. 

यामध्ये उपस्थितांनी विविध वस्त्र निर्मिती जसे की सोलापुरी साडी, सोलापुरी नऊवारी साडी, सोलापुरी सिल्क साडी, विविध सुंदर प्रकारचे वॉल हैंगिंग, पंचा इत्यादीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. 

इंटयाक सदस्य वस्त्र उद्योजक गोवर्धन चाटला यांनी या वारसा फेरीचं समन्वयन केलं, तर नियोजन सहसमन्वयक आर्किटेक श्वेता कोठावळे, समन्वयक प्रा. नरेंद्र काटीकर यांनी केले. आपल्या सोलापूर संस्कृतीतील एक अविभाज्य घटक म्हणून या वारसा फेरीस मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, सोलापूरकर उपस्थित होते. 

यावेळी ज्येष्ठ वास्तूविशारद डॉ. सिमंतिनी चाफळकर, प्रा. भीमगोंडा पाटील, प्राचार्य अनिता ढोबळे, प्राचार्य रूपाली धामणे, श्रीरंग रेगोटी, इतिहास तज्ञ नितीन अणवेकर, महाराष्ट्र राज्य एस.टी. डेपोचे अधिकारी शितल बिराजदार यांच्यासह अनेक इंटयाक सदस्य, सोलापूरकर इतिहासप्रेमी उपस्थित होते.

To Top