नांदेड : मराठी गझल विश्वात सामाजिक समरसतेचा सुर गझलेतून प्रभावीपणे उमटवणाऱ्या सतिश गुलाबसिंह मालवे यांच्या 'एक पक्षी' या गझल संग्रहास समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र तर्फे दिला जाणारा 'समरसता साहित्य पुरस्कार २०२५' नुकताच नांदेड येथे दि. २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या २० व्या समरसता साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
राज्यभरातील शेकडो साहित्य कृतींपैकी या संग्रहाची निवड करण्यात आली असून परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले की, समरसता, सामाजिक जागरूकता आणि संवेदनशील लेखन यांचे प्रतीक ठरणाऱ्या या गझलसंग्रहाची निवड ही विशेषत्वाने करण्यात आली आहे. 
मूळतः अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी (जिल्हा अमरावती) येथील आणि हल्ली पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर इथं वास्तव्यास असलेले सतिश मालवे, साहित्य जगतात 'सतिशसिंह' या नावानेही सर्वदूर परिचित आहेत. त्यांच्या गझलेत गावाची माया, आदिम संस्कृतीचा ठसा, मातीतली भावनिक समृद्धी आणि समाजभान यांचं चौफेर प्रभावी दर्शन घडतं.
या संमेलनात विशेष गझल सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच सत्रात सतिश मालवे यांनी आपल्या सशक्त गझल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सामाजिक वास्तव टिपणाऱ्या शेराने सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. 'एक पक्षी' हा गझलसंग्रह केवळ शायरीचा आस्वाद नाही, तर तो एका काळाची, समाजाची आणि व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव देतो.
या पुरस्काराच्या निमित्ताने सतिश मालवे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मराठी गझलला समरसतेचा सूर देणाऱ्या नव्या पिढीतील प्रगल्भ शायर म्हणून सतिश मालवे यांचं लक्षणीय योगदान आहे.
