ईद-ए-मिलाद २०२५ - च्या निमित्तानं पार पडली शांतता कमिटी बैठक
सोलापूर : उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत, असं पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) २०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती.
सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण यांनी या बैठकीची प्रस्तावना करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोणीही विनापरवाना मिरवणूक काढणार नाही, मिरवणूक मार्गावरील धार्मिकस्थळे विशेषःत लहान मोठी मंदिरासमोर नाच-गाणी करू नयेत अथवा मंदिरांवर आक्षेपार्ह चिज-वस्तू फेकू नये, नागरीकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे. ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) साजरा करतेवेळी सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असं प्रताप पोमण यांनी प्रास्ताविकात म्हटले.
सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करुन जातीय सलोखा अबाधित राखावा. एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरीत माहिती द्यावी. कोणत्याही धार्मिकस्थळी आक्षेपार्ह भाष्य/वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी, या सूचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सर्वांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्या नंतर सदर सुचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, अशा खात्याचे अधिकाऱ्यांनी त्या कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.
प्रारंभी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू असे सांगून ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) शुभेच्छा देऊन पोलीस आयुक्तांनी बैठकीस उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीस पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, (विभाग-२) खिरडकर, गुन्हे शाखा राजन माने, खिरडकर (वाहतुक शाखा), सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, महावितरण, आर.टी.ओ. चे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.
