समाजसेवेचा आदर्श- इप्पलपल्ली कुटुंबियांचा नेत्रदानाचा संकल्प

shivrajya patra

सोलापूर : येथील जयप्रकाश इप्पलपल्ली यांची धर्मपत्नी स्वर्गीय सौ. पुष्पावती इप्पलपल्ली यांनी नेत्रदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांतून प्रकाश देत राहावे, हा त्यांनी केलेला निर्णय आज अनेक गरजूंसाठी जीवनदायी ठरला आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या वतीने श्री. जयप्रकाश इप्पलपल्ली यांचा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्व. पुष्पावती इप्पलपल्ली आता आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या डोळ्यांमुळे दोन गरजू रुग्णांच्या आयुष्यात नवा प्रकाश उजळला आहे. “जग सोडून गेल्यानंतरही डोळे बोलतात, मृत्यूनंतरही इतरांना जग दाखवता येते”, याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे.

या उदात्त कार्यामध्ये इप्पलपल्ली कुटुंबियांचा सहकार्याचा सहभाग लक्षणीय आहे. त्यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी, धाडस आणि संवेदनशीलता यांचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, “इप्पलपल्ली कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा. नेत्रदानाच्या या उदात्त कार्यामुळे अनेकांच्या जीवनात नवा उजेड पसरला आहे. समाजाने अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी.”

नेत्रदान ही प्रत्येकाने स्वीकारण्याजोगी सामाजिक जबाबदारी आहे. आजच्या काळात “मृत्यूनंतरही आपण इतरांच्या डोळ्यांतून जगू शकतो”, हा संदेश इप्पलपल्ली कुटुंबियांनी समाजाला दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

To Top