सामाजिक संघटनांसह विविध पक्षांचे नेते सहभागी
गोरक्षेच्या नावाखाली सुरू झालेली झुंडशाही धार्मिक विद्वेष वाढविण्याला ठरत आहे कारणीभूत
सोलापूर : हा आपला लढा फक्त खाटीक समाजाचा नसून पशुपालक, शेतकरी आणि खाटीक समाजासाठी आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे, आवश्यक आहे. नाहक त्रास सहन केला जाणार नाही. कायदा हातात घेऊन समाजाला त्रास देणाऱ्यावर कारवाई करा, अशी रोखठोक मागणी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम राज्य सरकारकडे केली.
गुरुवारी, 07 ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातील खाटीक समाज व शेतकरी बांधवाच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद पूनम गेटपर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.
गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आडून गोरक्षेच्या नावाखाली सुरू झालेली झुंडशाही धार्मिक विद्वेषाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढविण्याला कारणीभूत ठरत आहे. स्वतःला गोरक्षक मानणारा वर्ग भाकड जनावरांच्या वाहतुकीतील वाहने अडवून त्यांना मारहाण दमदाटी करीत आहे, या प्रकाराला त्रस्त होऊन खाटीक वर्गाने तो धंदा अनिश्चित काळासाठी बंद केला असून, या व्यवसाय साखळीतील वर्गानं भव्य मूक मोर्चा काढून शेतकरी तसेच खाटीक समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडल्या.
आंदोलनकर्त्यांनी, 2014 नंतर केंद्रात आलेले सरकार मनुवादी असल्याचा आरोप करत, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या व्यवसायांवर व अस्तित्वावर संकट आणले जात असल्याचे स्पष्टपणे सांगितले. हे सरकार संविधानविरोधी व बेकायदेशीर कृत्ये करून समाजात द्वेषाचे राजकारण करत असल्याचे वक्तव्य करण्यात आले.
मंचावरून वक्त्यांनी सांगितले की, ज्या लोकांनी आयुष्यात मांजरही पाळलं नाही आणि प्राणीपालनाचा अनुभव नाही, त्यांनी स्वतःला ‘गोरक्षक’ म्हणून घोषित करून मुस्लिम व बहुजन समाजाच्या तरुणांवर बेदम मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला आहे. ही गोष्ट गंभीर असून शासन व पोलीस प्रशासन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गोशाळेतल्या जनावरांची स्थिती काय आहे, हे पाहा. बीफ मटनाच्या निर्यातदार कंपन्या कोणाच्या आहेत, हे पाहा. कुरेशी समाज भाकड जनावरे कापतात. देशात बीफ मटन खाणाऱ्यांची संख्या ३५ टक्के आहे. स्लॉटर हाऊस सुरू करून देणे, हे महापालिकेची जबाबदारी आहे. 'लढा फक्त खाटीक समाजाचा नाही, पशूपालक, शेतकऱ्यांचाही आहे, असंही माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी म्हटले.
कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी असली तरी भाकड म्हशींची वाहतूक व कत्तल कायदेशीर असतानाही मुस्लिम व बहुजन समाजातील युवकांवर केवळ जाती-धर्म पाहून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे धर्मद्वेषातून प्रेरित असून, देशभक्तीच्या नावाखाली मुस्लिमांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढल्याचे वक्त्यांनी म्हटलं आहे.
मोर्चात सहभागी लोकांनी पोलीस प्रशासनावर टीका करत सांगितले की, मुस्लीम व बहुजन युवकांवर विनाकारण गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत असून, गोरक्षकांना मुक्तपणे हिंसाचार करण्याची मुभा दिली जात आहे. शासनाच्या दबावामुळे पोलीस विभाग निष्पक्षपणे कारवाई करत नसल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मंचावरून मुस्लिम व बहुजन समाजातील युवकांना गोरक्षकांच्या अन्यायाविरोधात ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे खुले आवाहन करण्यात आले. हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्यांनी गोवंश हत्या बंदी कायदाच सद्य परिस्थितीत वादाचे मूळ कारण असल्याचे सांगत, हा कायदा तात्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली. तसेच बजरंग दल, हिंदू महासभा आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांवर तात्काळ बंदी घालावी, कारण त्या समाजात द्वेष पसरवत आहेत असा आरोप करण्यात आला
सध्या केंद्र व राज्य सरकार हे फक्त भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून, गरीब व्यावसायिकांवर अन्याय व अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले. भारतासारखा देश, जो मांस उद्योगात निर्यातदार म्हणून अग्रगण्य आहे त्याच देशात आता गरीब जनतेला व्यवसायाच्या नावावर टार्गेट केले जात आहे.
हा मोर्चा हा केवळ एका समाजाच्या हक्कांसाठी नव्हता, तर संविधानिक अधिकार, न्याय आणि सामाजिक समतेच्या रक्षणासाठी होता. अन्याय, दडपशाही आणि धार्मिक द्वेषाविरोधात हा लढा असून, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सर्व वक्त्यांनी यावेळी केली.
विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस पक्ष, एमआयएम पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय आठवले गट, वंचित बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन समाज पार्टी, माकप, समाजवादी पार्टी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जमियत उलमा ए हिंद, सुन्नी जमात ट्रस्ट, बागवान समाज, जमियत अहले हदीस, नदाफ समाज, तांबोळी समाज यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला. यावेळी ग्रामीण भागातून आलेल्यांची संख्या मोठी होती.
आडम मास्टर, सुबोध वाघमोडे, चेतन नरोटे, फारुख शाब्दी, कुरेशी जमातचे सदर आयुब कुरेशी याच्यासह अन्य पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
