सोलापूर : सलगरवस्ती पोलीस ठाण्याकडे दाखल 'सुवर्ण' अलंकार जबरी चोरीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेचे सपोनि विजय पाटील, सपोनि दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाने संशयित जोडगोळीस ताब्यात घेतले. ते होटगी रोडवरील तुळजाई लॉन्स जवळ, मोकळ्या मैदानात संशयितरित्या थांबले होते. त्यांची कसून चौकशी करता, उभयतांनी सेटलमेंटचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरीने नेल्याची कबुली दिलीय.
हत्तुरे वस्तीतील 19 वर्षीय आदित्य रमेश कोणदे आणि सैफुल परिसरातील पृथ्वीराज श्रीशैल पुजारी अशी ' सुवर्ण' अलंकार जबरी चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींची नावं आहेत. सेटलमेंट रोड विचारण्याच्या बहाण्याने भाच्यासोबत दुचाकीवर चाललेल्या इंदुबाई कांबळे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या जोडगोळीने जबरदस्तीने हिसका मारुन ओढून घेऊन गेले होते. ही घटना, 02 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल होता.
हा गुन्हा तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सपोनि पाटील, सपोनि काळे व त्यांचे पथकाने मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार संशयितपणे थांबलेल्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करता, उभयतांनी सोन्याचे गंठण हिसका मारून जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली. पथकाने दाखल गुन्ह्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा 2,00,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि विजय पाटील, सपोनि दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार-जावेद जमादार, महेश शिंदे, अजिंक्य माने, राजु मुदगल, धिरज सातपुते, आबाजी सावळे, कुमार शेळके, महेश पाटील, विठ्ठल यलमार व सायबर पोलीस टाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिन्द्र राठोड, चालक- काटे व काळे यांनी केली.
