सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सोहळ्यात सभासदांना भेटवस्तू आणि दिनदर्शिका प्रकाशन
सोलापूर : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीनं नववर्षानिमित्त सभासदांना सतरंजी भेटवस्तू आणि सन 2025 चे दिनदर्शिका प्रकाशन लेबर फेडरेशनच्या कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक गावडे, सहकारी अधिकारी अर्जुन तांबट, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन मुजीब शेख, कामवाटप समिती सदस्य श्याम पवार संचालक चंद्रकांत अवताडे, राजू सुपाते अरुण घोडके अरुण थेटे संजय साळुंखे यशवंत शिंदे नागेश साठे, शिवाजी चव्हाण राज्य फेडरेशन प्रतिनिधी अभिराज शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रारंभी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी प्रास्ताविकात मजूर संस्थांच्या अडीअडचणीबाबत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चेअरमन शंकर चौगुले यांनी केले. 25 वर्षानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून संस्थेच्या वतीने भेटवस्तू भेट स्वरूपात देण्यात आली.
लेबर फेडरेशनच्या सभासदांना आणि मजूर संस्थांना कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ संस्थेच्या काम वाटपासंदर्भात आपण हस्तक्षेप करून मजूर संस्थांना कामं कशी मिळतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी उपस्थित सभासदांना दिली.
सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद असून या पुढील काळात आपली सहकार्याची भूमिका असणार असल्याचेही उपनिबंधक गायकवाड यांनी यावेळी म्हटले.
यावेळी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
... चौकट ....
काम वाटपासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावावी : चेअरमन शंकर चौगुले
मजूर संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी यासंदर्भात सहकारी संस्थांचे नियंत्रण महाराष्ट्र राज्यात राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे येत असते. यामुळे अडचणीत सापडलेल्या मजूर संस्थांना काम वाटपासह इतर अडचणी दूर व्हाव्यात. येणाऱ्या काळामध्ये काम वाटपासंदर्भात आपण महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी आशा संस्थेचे चेअरमन शंकर चौगुले यांनी उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासमोर व्यक्त केली.