Type Here to Get Search Results !

... शिक्षक समाधानी राहिला तरच प्रभावीप्रमाणे करू शकतो अध्यापन : शिक्षण अधिकारी कादर शेख

सोलापूर : शिक्षकांची सर्व प्रकारची कामे वेळेवर झाल्यास शिक्षक हा समाधानी राहून आपले अध्यापन प्रभावीप्रमाणे करू शकतो, याची जाण शिक्षण विभागाला आहे. शिक्षकांची कोणत्याही प्रकारची कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची आम्ही काळजी घेतो. आपली काही कामे प्रलंबित असल्यास आपण थेट मला फोन करून किंवा व्हाट्सअप वरून मला सांगू शकता, असे आवाहन जि.प. सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी केले.

कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सोलापूर, बहुजन शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर, ऊमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, 12 जानेवारी रोजी येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात राष्ट्रमाता जयंती महोत्सव अंतर्गत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) कादर शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत शिक्षक, सावित्रीची लेक, जिजाऊची लेक, फातिमा की बेटी, आदर्श शाळा, आदर्श पत्रकार, आदर्श केंद्रप्रमुख आदर्श विस्तार अधिकारी आदर्श जि. प. कर्मचारी पुरस्कार 2024-25  चे पारितोषिक वितरण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि जिल्हा परिषद सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.  

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी, कास्ट्राईब शिक्षक संघटना करत असलेल्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा आढावा मांडला. त्यांनी  रक्तदान, विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या रंगभरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, 12500 विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग, अनाथ महिला व मुलींचे शिक्षणासाठी संघटनेने घेतलेले विविध उपक्रम सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी कादर शेख होते.

विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकांची समाजाला व देशाला गरज आहे. असं प्रतिपादन प्रमुख पाहुण्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून केले. त्यांनी राष्ट्रमातांचे स्मरण करताना, माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख यांच्या त्यागामुळेच मुलींचे शिक्षण सुरु झाले, हे  समाजाने विसरता कामा नये. त्यांनी केलेल्या कार्याचा जागर आपण केला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगताना, शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या.

शिक्षणाधिकारी शेख यांच्या हस्ते रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतिय  क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कास्ट्राईब शिक्षक संघटना करीत असलेल्या सामाजिक शैक्षणिक व राष्ट्रीय कार्याचा त्यांनी गुणगौरव केला.

वालचंद कॉलेजच्या प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी राष्ट्रमातांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर व्याख्यान देऊन उपस्थितांना त्यांना मंत्रमुग्ध केले. ऊमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. अर्चना राठोड यांच्या हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सचिव तथा बहुजन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमलिंग कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गोपाळ सितारे आणि शिवशंकर राठोड यांनी केले.

.... चौकट .....

गुणवंत शिक्षकांमुळेच शिक्षणाची अखंड ज्योत तेवत ठेवणे झालंय शक्य : शिक्षणाधिकारी कादर शेख

शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी, गुणवंत शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, आपल्यासारख्या प्रामाणिक आणि गुणवंत शिक्षकांमुळेच शिक्षणाची अखंड ज्योत तेवत ठेवणे शक्य झाले असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षणाधिकारी शेख सांगितले.