सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. मंगळवारी, ०४ जून रोजी सकाळी ०८.०० वा. पासून शासकीय धान्य गोदाम, रामवाडी, सोलापूर येथे ४२ सोलापूर व ४३ माढा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरु होणार आहे. त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय धान्य गोदाम, रामवाडी, सोलापूर येथे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता, १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश जारी केले असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलीय.
या आदेशान्वये मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय धान्य गोदाम, रामवाडी लगतचे १०० मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास, वाहनांचे आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्यानुसार शासकीय धान्य गोदाम, रामवाडी येथील आतील संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब्लेट, संगणक व तत्सम संदेशाची देवाण-घेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास/वापरण्यास/हाताळण्यास प्रतिबंध असणार आहे. तंबाखुजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणे, मतमोजणी केंद्राचे परिसरात निवडणूक विषयक अधिकारी/कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्ती यांनी मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे, पत्रकार व माध्यम प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल व कॅमेरासह प्रवेश करणे, निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवानाशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करणे, यावर निर्बंध राहतील.
निवडणूक आयोगाच्या प्रवेशिका प्राप्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधी यांना शासकीय धान्य गोदाम, रामवाडीचे आतील परिसरातील मिडीया सेंटरपर्यंत मोबाईल व कॅमेरा (कॅमेरा प्रवेशिकेत नमूद असणे आवश्यक) बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हा बंदी आदेश निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, बंदोबस्तास असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, राज्य व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना लागू असणार नाही. या आदेशाचा भंग भारतीय दंड विधानाचे कलम १८८ प्रमाणे शिक्षापात्र अपराध राहील, असंही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी त्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
हा बंदी आदेश मंगळवारी, ०४ जून रोजीचे ०६.०० वा. पासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असंही सांगण्यात आलंय.