पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची २०२४ ते २०२८ या कालावधी करिता निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत विविध पदांकरिता करिता कोणाचाही ज्यादा अर्ज न आल्याने ही निवडणूक आज बिनविरोध पार पडली. श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी ॲड. धीरज सोपानराव कोल्हे यांनी जाहीर केले. अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी सोलापूरचे महेश गादेकर यांची निवड झाली.
या निवडणुकीत भारतीय खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदोरचे नितिन कोठारी उपस्थित होते. यावेळी भारतीय खो खो महासंघ महासचिव एम. एस. त्यागी यांची विशेष उपस्थिती होती. खो-खो हा खेळ ४९ देशात खेळला जात असून ३७ देशांत राष्ट्रीय खो-खो संघटनांची स्थापना झाली असून तेथे खोखो खेळ नियमित खेळला जात असल्याचे सांगितले व लवकरच खो-खो विश्वचषक स्पर्धा २०२४ च्या अखेरपर्यंत आयोजित करणार असल्याचे त्यागी यांनी सभेला मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. या सभेला सहसचिव, भारतीय खो खो महासंघ उपकार सिंग व सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन अनिल झोडगे यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पहिले. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन माननीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले, तर चंद्रजीत जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
पदाधिकारी असे : अध्यक्ष - संजीवराजे नाईक - निंबाळकर (सातारा), उपाध्यक्ष: डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), अनिकेत तटकरे (रायगड), महेश गादेकर (सोलापूर), अशोक पितळे (अहमदनगर), कार्याध्यक्ष - सचिन गोडबोले (पुणे), सरचिटणीस - डॉ. चंद्रजीत जाधव (धाराशिव), खजिनदार - ॲड. गोविंद शर्मा (औरंगाबाद), संयुक्त चिटणीस: डॉ. राजेश सोनवणे (नंदुरबार), डॉ. पवन पाटील (परभणी), जयांशू पोळ (जळगाव), बाळासाहेब तोरसकर (मुंबई), वर्षा कच्छवा (बीड).