पुळूज/दत्तात्रय पांढरे :
आजमितीला वैद्यकीय, विधी, शिक्षण,पोलीस प्रशासन, एस.टी. चालक-कंडक्टर, राजकीय पटलावर महिला सक्षमपणे कार्य करीत आहेत. त्यामुळे महिलांनी स्वतःला कधीही अबला समजू नये. प्रत्येक महिला कला-गुणांनी संपन्न असतेच, विद्यार्थीनींना कला-गुणाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते, असं प्रतिपादन तृप्ती खरे यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या पत्नी तथा समाजसेविका सौ. तृप्ती खरे, यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री दर्लिंग प्रशाला आणि भास्कर अप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रकला, रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका सौ. तृप्ती खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य जे. बी गायकवाड, गोपाळपूरच्या उपसरपंच उज्वला बनसोडे, माजी सरपंच वंदना सोनटक्के, जिजाऊ ग्रामीण महिला पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे, सारिका वाघ, दिपाली गायकवाड, अश्विनी वाघ, डॉ. वैशाली गायकवाड, स्मृति मोरे, पुनम मोरे, आर पीआय कार्याध्यक्ष विजय वाघमारे. ज्ञानेश्वर शिखरे, लखन वाघमारे यांच्यासह महिला शिक्षक, विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.