सोलापूर : सरकारी नोकरावर हल्ला करणे, इतरांचे जिवित किंवा व्यक्तीगत सुरक्षिततेस धोका आणणारी कृती करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अजय संतोष मैंदर्गीकर (वय-२६ वर्षे) यास पोलीस उप-आयुक्त, (परिमंडळ) विजय कबाडे यांच्या आदेशान्वये सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार तडीपार करण्यात आलंय.
सन-२०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आल्याने, त्याचेविरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ)(ब) अन्वये चा हद्दपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ, सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
त्या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त, (परिमंडळ) विजय कबाडे यांच्या आदेशान्वये अजय संतोष मैंदर्गीकर (वय-२६ वर्षे, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सोलापूर) यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा असे दोन जिल्ह्यातून ०२ वर्षांकरीता १३ मार्च रोजीपासून हद्दपार/तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर वडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे सोडण्यात आलं आहे.