Type Here to Get Search Results !

शुक्रवारच्या विरोध प्रदर्शनाला नाकारलीय परवानगी ! विना परवाना संप-मोर्चे, आंदोलन-निदर्शने, विरोध प्रदर्शन करण्यास मज्जाव : डॉ. दिपाली काळे

 

सोलापूर  :  केंद्र सरकारने संपूर्ण भारतात लागू केलेल्या CAA या कायद्याचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी, १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पूनमगेट या ठिकाणी विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळण्याकरीता एका पक्षाच्या अध्यक्षानं पोलीस आयुक्तांकडं अर्ज दिला होता. अशा प्रकारचे आंदोलन केल्यास त्यावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांततेचा बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता, त्या अर्जदारांना सदर बझार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विरोध प्रदर्शन करण्यासासाठी परवानगी नाकारल्याची माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिलीय.

राज्य शासन व केंद्र शासन हे आवश्यकतेनुसार विविध योजना, तसेच कायदे अंमलात आणत असतात. त्यास अनेक पक्ष/संघटना व व्यक्ती यांचा तीव्र विरोध अथवा आक्षेप असतो. ते आपला विरोध व्यक्त करण्यासाठी अचानकपणे संप, मोर्चे, धरणे, निदर्शने असे प्रकार करत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक जन-जीवन विस्कळीत होत असते.

महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती साजरे करणारे शहर म्हणून सोलापूर शहराचा नावलौकीक आहे. शिवाय छोट्या-मोठ्या कारणांवरुन संप, आंदोलन, निदर्शने, धरणे असे प्रकार येथे नेहमी होत असतात.

सध्या रमजानचे रोजे सुरु आहेत. त्यातच इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षा सुरु असून, इतर सण-उत्सव ही सुरु आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणूका या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभा, मोर्चे, निदर्शने, विरोध दर्शक आंदोलने, धरणे इत्यादी करीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच ०५ किंवा ०५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) प्रमाणे प्रतिबंध घालण्यात आला असून तसे आदेश पारित करुन प्रसिध्द करण्यात आले आहेत.

सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही विना परवाना ०५ वा ०५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन संप, मोर्चे, आंदोलन, निदर्शने, विरोध प्रदर्शन अथवा धरणे या सारखी आंदोलने केल्यास तसेच अशा आंदोलनासाठी समविचारी लोकांना एकत्र जमविण्यासाठी समाज माध्यमांवर आवाहन केल्यास अशा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.