Type Here to Get Search Results !

व्रतस्थ पत्रकारांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम अनुकरणीय : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे


सोलापूर : सोलापूरला पत्रकारितेची एक उज्वल परंपरा लाभलीय. वास्तववादी आणि परखड भूमिका यातून दिसून येते. या मंडळींनी आपलं आयुष्य पत्रकारितेला वाहून घेतल्याचं आपण पाहिलंय. अशा व्रतस्थ ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा उपक्रम हा अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचं औचित्य साधून येथील आय. एम. ए. सभागृहात रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, उद्योजक दत्तात्रय सुरवसे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष सागर शहा, केतन शहा, श्याम पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत आदींची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावलं असून आजच्या आधुनिक काळात नव्या तंत्रासह हा वसा पुढे नेताना, सकारात्मक दृष्टिकोन असलेली परंपरा कायम असल्याचं पाहताना आपल्याला मनस्वी समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. 

जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांसाठी शासन राबवीत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन करताना सोलापूरच्या पत्रकारितेची विशेषता नमूद केली. 

दरम्यान ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, चंद्रशेखर कव्हेकर, हेमंत चौधरी, शंकर जाधव, दशरथ वडतीले, विजयकुमार पिसे, शहाजहान अत्तार, अनिल कुलकर्णी, बाळासाहेब वाघमोडे, सोलापूर विद्यापीठाचे माजी पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांचा माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 

यावेळी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार बांधवांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारिता करताना, ज्येष्ठ पत्रकारांचं मार्गदर्शन सतत मिळत राहावं आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं. 

याप्रसंगी दैनिकं तसंच विविध वृत्तवाहिनीचे पत्रकार त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते सूत्रसंचालन आणि आभार  खजिनदार अभिषेक आदेप्पा यांनी मांडले.