Type Here to Get Search Results !

श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास गुरुवारी ११ जानेवारीपासून प्रारंभ


सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला रूढी परंपरेप्रमाणे ९०० वर्षाचा वारसा आहे. श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास परंपरेप्रमाणे गुरुवारी, ११ जानेवारीपासून प्रारंभ होतो. १२ जानेवारी रोजी कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिली व दुसरी नंदी ध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर हिरे हब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. १३ जानेवारी रोजी सकाळी ८.०० वाजता हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांची पूजा झाल्यावर यात्रेस प्रारंभ होतो. १७ जानेवारी रोजी रात्री कप्पड कळीने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी बुधवारी, सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेचे प्रमुख व पहिल्या नंदी ध्वजाचे मानकरी (पुजारी) राजशेकर हिरेहब्बू यांनी, श्री सिद्ध रामेश्वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबे यातील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री मठपती (स्वामी) हा योगदंड शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेठे यांच्या वाड्यात घेऊन जातात, तेथे मानकरी हिरेहब्बू आल्यावर योगदंडाची विधिवत पूजा होते, त्यानंतर होमहवन व हिरेहब्बू यांचे शेटे यांचे वारस अॅड. मिलिंद थोबडे हे पाद्यपूजा करतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो, तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ होतो. ही प्रथा ९०० वर्षापासून आजतागायत चालत आली असल्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकारांशी बोलताना प्रारंभी सांगितले.



१२ जानेवारी रोजी रात्री १२.५ वा. कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिली व दुसरी नंदी ध्वजास सांज चढविण्याचा कार्यक्रम होतो त्यानंतर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. १३ जानेवारी रोजी सकाळी ०८ वा. हिरेहब्बू वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू अन् देशमुख यांच्या हस्ते पूजा झाल्यावर यात्रेस प्रारंभ होतो. श्री सिद्धेश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ ०१ ते ०७ काठ्या येऊन उभारल्यावर सरकारतर्फे देशमुख हे हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करतात. हा मान ब्रिटिश काळापासून आजतागायत चालू आहे, असं राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



तेथून हे नंदीध्वज श्री सिद्धरामेश्वर मंदिरात, ६८ लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्या ठिकाणी सात नंदीध्वज आल्यावर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधिवत पूजन करतात. मानकऱ्यांना विडा दिल्यावर ६८ लिंगास यन्नीमज्जन (तैलाभिषेक) प्रारंभ होतो. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गदगीस तैलाभिषेक घालून विधिवत पूजा हिरेहब्बू करतात. त्यानंतर ६८ लिंगास तैलाभिषेकास सुरुवात होते, हे नंदीध्वज ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री नऊ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात परत येतात, असं हिरेहब्बू यांनी सांगितले.

१४ जानेवारी रोजी अक्षता सोहळा होतो. सकाळी, ०७.०० वा. हिरेहब्बू यांच्या वाड्यात हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीने सातही नंदीध्वज श्री सिध्दरामेश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी येतात. यावेळी श्री शिवसिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा हिरेहब्बू व देशमुख करतात. त्यानंतर हिरेहब्बू यांच्या हस्ते कुंभार यांना विडा दिला जातो. विडा दिल्यानंतर तम्मा शेटे संमती मंगलाष्टक हे हिरेहब्बू यांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर हिरेहब्बू व देशमुख हे त्या संमतीची विधीवत पूजा करून हिरेहब्बू शेटे यांना विड्याचा मान देतात, त्यानंतर हिरेहब्बू, देशमुख आणि तम्मा शेटे त्या ठिकाणी तम्मा शेटे यांच्या संमती वाचनाने अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतो, यंदा दुपारी १ वा.पर्यंत अक्षता होईल, असंही त्यांनी सांगितले.



१५ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास करमुटगी लाऊन योगदंडास स्नान घालतात. त्यानंतर १ ते ७ नंदीध्वजास करमुटगी लाऊन स्नान घातल्यावर अमृत लिंगाजवळ गंगापूजनाचा कार्यक्रम होतो. सायंकाळी ०५ वा. जुनी फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणी तर २ ते ७ नंदीध्वजास बाशिंग बांधतात. सध्या नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगाणे यांच्याकडे असून ते दिवसभराचा उपवास करून तो नंदीध्वज एकट्याने होम मैदानापर्यंत आणतात. सायंकाळी कुंभार कन्येस सजवून विधीवत पूजा होते. त्यानंतर हिरेहब्बू होमकुंडात कुंभार कन्येस अग्नी  देतात, त्यानंतर तिळगुळाचा कार्यक्रम होतो, भाकणूक झाल्यावर सर्व नंदीध्वज परत मिरवणुकीने रात्री ०१ वा. हिरेहब्बू यांच्या वाड्यात येतात, त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो, त् असे हिरेहब्बू यांनी सांगितले.

१६ जानेवारी रोजी धार्मिक रूढी परंपरेप्रमाणे सायंकाळी ०५ वाजता नंदीध्वज होम मैदानावर येतात, तेथे शोभेचे दारूकाम झाल्यानंतर नंदीध्वज परत मंदिरात येतात. मंदिरात आल्यावर श्री सिद्धरामेश्वरांच्या गर्भ मंदिरास ०५ प्रदक्षिणा व त्यानंतर १ ते ५ नंदीध्वज ५ प्रदक्षिणा घालतात, त्यानंतर सहावी व सातवी नंदीध्वज ०५ प्रदक्षिणा घालतात, ही रुढी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. रात्री १२ वाजता हिरेहब्बूंच्या वाड्यात नंदीध्वज आल्यावर मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज धारक व मानकऱ्यांना प्रसाद देण्याचा कार्यक्रम असतो. १७ जानेवारी रोजी रात्री कप्पडकळीने यात्रेची सांगता होते, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.



या पत्रकार परिषदेस मानकरी संजय हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, गणेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, नंदीकोल मास्तर योगीनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, गंगाधर कल्याणकर, योगीनाथ मेंगाणे, सागर स्वामी, कुंभार परिवारातील भीमाशंकर म्हेत्रे, फणी नंदीध्वज मानकरी मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, जगदीश बिराजदार, आनंदजी खाणे, रेवणसिद्ध माळी, मलकु हैत्रे, प्रशांत कुमठेकर, कुमार शिरसी, सोमनाथ मेंडके, शिवानंद बनसोडे, मारुती बनसोडे, प्रकाश बनसोडे, सुदेश देशमुख, बाळासाहेब मुस्तारे, राजशेखर आमणगी, सुहास दर्गोपाटील, विजयकुमार भोगडे, चिदानंद मुस्तारे, नागनाथ मेंगाणे यांच्यासह अन्य मानकरी उपस्थित होते.