... ठळक ...
सन 2023 -24 साठी जिल्ह्याचा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा उद्दिष्ट माहे मार्च 2024 अखेर 100% पूर्ण करण्याचे करावे नियोजन
खरीप हंगाम पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 2 हजार 500 कोटीचे होते तर बँकांकडून 2 हजार 172 कोटीचे कर्जवाटप, रब्बी हंगामासाठी 2 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून बँकांनी 30 नोव्हेंबर 2023 अखेर 600 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे
नाबार्डचा सोलापूर जिल्ह्याचा सन 2024-25 चा प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा धोरण पुस्तिकेचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रकाशन, नाबार्ड कडून जिल्ह्याचा 13 हजार 760 कोटीचा आराखडा जाहीर
आरसिटी कडून सन 2024 -25 या वर्षात 1200 उमेदवारांना 40 प्रशिक्षण सत्रातून प्रशिक्षित करण्यास मान्यता प्रदान
सोलापूर : जिल्ह्याचा सन 2023- 24 चा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा 10 हजार 799 कोटीचा असून 30 सप्टेंबर 2023 अखेर बँकांनी 6 हजार 952 कोटीचा कर्ज पुरवठा केलेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी क्षेत्र व प्राधान्यक्रम क्षेत्रा बाबत अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जपुरवठा करावा व कर्ज पुरवठा करण्याचे उर्वरित उद्दिष्ट माहे मार्च 2024 अखेर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अग्रणी कार्यकारी समितीच्या माहे सप्टेंबर 2023 अखेरच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक अरुण प्रकाश, आरबीआयचे अग्रणी अधिकारी अक्षय गोंदेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाख्रडे, सहाय्यक अग्रणी बँक व्यवस्थापक प्रतीक धनाळे, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, आरसिटी चे संचालक दीपक वडेवाले, महापालिकेचे पीएम स्व निधीचे समन्वयक समीर मुलानी, श्रीमती गणेशन यांच्यासह सर्व सार्वजनिक, खाजगी व जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी क्षेत्राला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचे 2 हजार 100 कोटीचे असलेले उद्दिष्ट बँकांनी सप्टेंबर 2023 अखेर 1 हजार 443 कोटी असे 69 टक्केच पूर्तता केलेली दिसून येत आहे. तरी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँकांनी कृषी क्षेत्राला दीर्घ मुदतीचा पुरवठा करणारे प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. इंडसलँड बँकेला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा चे 12 कोटीचे उद्दिष्ट होते तरी या बँकेने 413 कोटीचा कर्ज पुरवठा केलेला असून इतर सर्व बँकांनी इंडसलँड बँकेचा आदर्श समोर ठेवून कृषी क्षेत्रात दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. त्याप्रमाणेच कृषी व प्राधान्य क्षेत्रातील सेक्टर वाईज ज्या बँकांनी चांगला कर्ज पुरवठा केलेला आहे व ज्या बँकांनी कर्ज पुरवठा नगण्य प्रमाणात केलेला आहे त्यांचा परस्परात योग्य समन्वय करून कर्ज पुरवठ्यात कशा पद्धतीने वाढ होईल यासाठी एलडीएम ने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.
बँकांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, किसान क्रेडिट कार्ड व अन्नप्रक्रिया उद्योग या अंतर्गत संबंधित विभागाकडून येणाऱ्या लाभार्थ्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर निकाली काढण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. यातील कर्ज प्रकरणे रिजेक्ट होणार नाहीत याबाबत बँकांनी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पी एम स्व निधी योजना, असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी अटल पेन्शन योजना, विविध महामंडळाकडून येणारी कर्ज प्रकरणे याबाबत बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत, अशाही सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
आरसिटी कडून यावर्षी 1200 उमेदवारांना 40 प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षित करण्यात येणार असून सर्व बँकांनी आरसिटी कडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्वरित कर्ज पुरवठा होईल याबाबत प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे यांनी जिल्हा वार्षिक कर्जपुरवठा 2023- 24 आराखड्याची सविस्तर माहिती देऊन जिल्ह्यातील बँकांनी 10 हजार 799 कोटी पैकी 6 हजार 592 कोटीचा कर्जपुरवठा 30 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण केल्याची माहिती दिली. यावर्षी खरीप हंगामात उद्दिष्टाच्या 86 टक्के कर्ज पुरवठा तर रब्बी हंगामात सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत उद्दिष्टाच्या 30 टक्के कर्ज पुरवठा बँकांनी केलेला असून प्राधान्य दहा हजार आठशे कोटी पैकी 6 हजार 952 कोटी कर्ज पुरवठा बँकांनी केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
नाबार्डचा सन 2024-25 चा 13 हजार 760 कोटीचा संभाव्यता युक्त ऋण योजना आराखडा जाहीर
जिल्हास्तरीय अग्रणी कार्यकारी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते नाबार्ड कडून सोलापूर जिल्ह्याचा सन 2024- 25 चा संभाव्यता युक्त ऋण योजना आराखडा पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले. हा आराखडा एकूण 13 हजार 760 कोटी 57 लाख 23 हजाराचा असून यामध्ये कृषी कर्ज पिक उत्पादन व्यवस्थापन मार्केटिंग कृषी व कृषी संलग्न क्षेत्राला दीर्घ मुदती कर्ज पुरवठा कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती असा एकूण 8 हजार 550 कोटी 15 लाख 71 हजाराचा कर्जपुरवठा तर लघु, लहान व मध्यम व्यवसायासाठी 3 हजार 936 कोटी 15 लाख तर निर्यात कर्ज, शिक्षण, गृह कर्ज, सामाजिक पायाभूत सुविधा, रिन्यूअल एनर्जी व इतर असा 1 हजार 274 कोटी 26 लाख 52 हजार अशी क्षेत्रनिहाय तरतूद करण्यात आलेली आहे.