Type Here to Get Search Results !

कामगारांना पीएफ व पेन्शन त्वरित मिळावी; अन्यथा धरणे आंदोलन : विष्णू कारमपुरी


सोलापूर : सोलापुरातील विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना निवृत्तीनंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील बेजबाबदार कारभारामुळे वरील रक्कम मिळण्यास विनाकारण वेळकाढूपणा होत आहे. म्हणून कामगारांना मिळायची लाभाची रक्कम त्वरित मिळावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेना व राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक) या दोन्ही संघटनेच्या संयुक्तपणे, कामगार संघटना महासंघाच्या माध्यमातून, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) व इंटकचे सदस्य राहुल गुजर, यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

कामगार संघटना महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, यात ८० टक्के महिलांचा सहभाग आहे. या सर्व महिला कामगार सोलापुरात विविध विडी कंपन्यांमध्ये काम करतात. यात बहुसंख्य महिला या अशिक्षित आहेत. 

त्यामुळे काम करीत असलेल्या कंपनीत कामगारांचे नाव नोंदवीत असताना, चुकीचे नाव, आडनाव, पतीचे नाव , वडिलांचे नाव, आणि जन्मतारीख चुकीची नोंदविली गेली आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कामकाजासाठी पेन्शन योजना व निवृत्तीनंतरचे इतर शासकीय लाभ मिळवून घेण्यासाठी अडचणीचे होत आहे. विशेष करून भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत मिळणाऱ्या लाभाचा फायदा मिळवून घेण्यासाठी सर्वात जास्त कठीण जात आहे. याबाबत महिला विडी कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आले असता, तेथील गेटवरील कर्मचारी कामगारांना हुसकावुन लावतात. आम्हाला साहेबांना भेटायचं आहे, असे म्हणाले तरी ऐकून न घेता कामगारांना परत पाठवितात.

अशा प्रकारामुळे कामगारांचे विनाकारण आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारचे त्रास होत आहे. तरी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी या नात्याने आपल्या महिला विडी कामगारांना होणारा त्रास कमी करून, तसेच भविष्य निर्वाह निधी अर्जात झालेल्या चुका दुरुस्ती करून देऊन, गरीब कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.


विष्णू कारमपुरी व राहूल गुजर यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नसीमा शेख, रेखा आडकी, दौलतबी पुनेवाले, राधाबाई जक्कन, सौरम्मा येदूर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्यासह विडी कामगार महिला उपस्थित होते.


...फोटो ओळी...

विडी कामगारांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधी त्वरित मिळावे, यासाठी भविष्य निर्वाह निधी सोलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त ललितसिंह नाईक यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विष्णू कारमपुरी, राहुल गुजर, नसीमा शेख व विडी कामगार महिला छायाचित्रात दिसत आहेत.