Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचे ०९ संघ रवाना



कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिल्या शुभेच्छा !

सोलापूर : राज्यपाल कार्यालय आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव यंदा पहिल्या टप्प्यात दि. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे होणार आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मुला-मुलींचे एकूण ०९ संघ स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी सर्व संघाच्या खेळाडूंना आणि मार्गदर्शक व समन्वयकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत बसवराज दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  यंदाचा हा २५ वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आहे. यंदा नव्याने काही क्रीडा स्पर्धांचे समावेश करण्यात आल्याने हा महोत्सव ०२ टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील क्रीडा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे होणार आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठाचे बास्केटबॉल मुले आणि मुली, हॉलीबॉल मुले आणि मुली, अॅथलेटिक्स मुले आणि मुली, बॅडमिंटन मुले आणि मुली तसेच टेबल टेनिस मुले असे एकूण ०९ संघ रवाना झाले. 

यासाठी एकूण ७८ खेळाडू, ९ मार्गदर्शक व व्यवस्थापक आणि एक समन्वयक असे एकूण ८९ जणांचा चमू रवाना झाला आहे. दुसरा टप्प्यातील क्रीडा महोत्सव २० जानेवारीपासून लोणारे येथे होणार आहे. या सर्व संघांना विद्यापीठ प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.


...फोटो ओळी

सोलापूर: राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ रवाना झाला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे व अन्य छायाचित्र दिसत आहेत.