सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर शहरामध्ये एखाद्या सिनेमाचे शूटिंग होन तसा दुर्मिळ क्षणच ! मात्र शिरापूरचे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना या मराठी सिनेमाचे चित्रीकरण शहरातील सात रस्ता या मुख्य चौकामध्ये काल चित्रीत करण्यात येत होते. सदर सिनेमाचे चित्रीकरण पाहण्यासाठी सोलापूरकरांनी दिवसभर गर्दी केली होती.
यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेमध्ये एका हिंदी सिनेमाची शूटिंग करण्यात आले होते, त्या सिनेमांमध्ये प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांनी भूमिका साकारल्यामुळे त्या चित्रीकरणासाठी शक्ती कपूर हे सोलापूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये दाखल झाले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शिरापूरच्या मातीमध्ये तयार होत असलेल्या या बिग बजेट सिनेमाचे चित्रीकरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असून जास्तीत जास्त चित्रीकरण हे शिरापूर गावातच होणार असल्याचे सजना या सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मूलभूत सोई-सुविधा आणि शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या डोंबारी समाजाच्या जीवनावरती या चित्रपटाची कथा आधारलेली असून रस्त्याच्या कडेला चार लाकडं रोवून आणि त्याच्यावर दोरी बांधून खेळ करणारा हा समाज पोटासाठी वाटेल, त्या कसरती करतो. डोक्याच्या केसाला दगड बांधून तो उचलणे, हाताने दगड फोडणे, गोल गरगरीत दगड उंच फेकून तो छातीवर झेलने अशा नानाविध कसरती करून हा समाज आतापर्यंत आपली उपजीविका करत गावोगाव भटकत राहिला आहे .या समाजाच्या जीवनाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न धोत्रे यांनी केला आहे.