सोलापूर : येथील महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा ज्येष्ठ समाजसेविका उषा बर्वे यांचे वार्धक्याने निधन झाले. पुण्यात एका रुग्णालयात उपचार घेत असताना, त्यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्या मृत्यूसमयी ८८ वर्षांच्या होत्या.
ज्येष्ठ समाजसेविका उषा बर्वे सोलापुरात जनसंघापासून कार्य करीत होत्या. १९९२ ते ९७ या काळात सोन्या मारुती, दक्षिण कसबा या भागातून त्या निवडून आल्यावर त्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले होते. अगदी बालवयात राष्ट्रसेविका समिती जनसंघ व भारतीय जनता पक्षाच्या त्या आघाडीच्या कार्यकर्त्या अशी त्यांची जनमाणसांत ओळख होती.
१९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वाट्याला कारावास देखील आला होता. राजकीय पक्षाचे काम करीत असताना सोलापूर शहरात दुर्लक्षित भागात जाऊन संस्कार केंद्रेही चालवली. अनेक सामाजिक कामात त्या आघाडीवर कार्यरत होत्या. नाट्यक्षेत्राची आवड असल्याने त्यांनी अनेक नाटकांत कामे केली.
माजी नगरसेविका काशिताई कुलकर्णी यांनी सुरु केलेली बाल विद्या विहार ही शाळा त्यांच्या पश्चात त्यांनी नेटाने चालवली. त्या शाळेच्या त्या अध्यक्ष देखील होत्या. त्यांच्या या सामाजिक कामाच्या ओढीने त्यांच्या घरातील सर्वच कुटुंबीय निरनिराळ्या क्षेत्रात सामाजिक कामात कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा व दोन विवाहित मुली सुना, नातवंडे-पतवंडे असा परिवार आहे. सोलापूर शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेकांनी त्यांच्या निधनावर संवेदना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.