अक्कलकोट : तालुक्यातील पितापूर या गावात काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबल्याने अवघ्या १०-१२ दिवसात काढणीला आलेले सोयाबीन व उडीद चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी मध्यरात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे हरणा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पितापूरसह, नन्हेगाव, आकतनाळ, बोरेगाव, हन्नूर व चपळगाव परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी थांबले आहे. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती देण्यासाठी कंपनीच्या नंबरवर फोन केला असता, त्यांना संबंधित कंपनीकडून आठ ते दहा दिवस थांबा, मग सर्वे होईल, असे सांगितले जात आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिके पाण्यात असल्यानं सालभर कष्ट उपसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पितापूर गावातील महबूब सगरी, लाडलेसाब सगरी, दिलीप व्हनमाने, भुताळी व्हनमाने, लिंबाजी व्हनमाने यांच्या शेतातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यासह शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी विमा कंपनीने १० दिवस प्रतिक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. विमा कंपनीने तात्काळ पिक विमा देण्याची आग्रही मागणी आहे.
आम्ही कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचे विमा कंपनीला फोन करून कळविले.परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, किंवा तक्रार क्रमांक देण्यात आला नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी पितापूरचे शेतकरी दिलीप व्हनमाने यांनी केली आहे.